शेतकऱ्यांना न्याय मिळाला, काय म्हणाले बैलगाडा शर्यतींवर अजित पवार…

94

“राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली असून त्यांना न्याय मिळाला. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत शरद पवार यांनी लक्ष घातले. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेने, संपूर्ण ताकदीने लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारने सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिले. त्यातून मिळालेले हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.

‘शेतकऱ्यांचाच विजय होणार’

बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र, शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचे पालन करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असले तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – हुररर्र….राज्यात 7 वर्षांनी बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार!)

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तब्बल 7 वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. राज्य सरकारच्या बाजूने वकिल मुकुल रोहितगी यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. गुरुवारी झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला आहे. राज्यभरात बैलगाडा प्रेमींकडून जल्लोष केला जात आहे.

7 वर्षांनी मिळाली परवानगी

कोर्टाने घालून दिलेल्या अटींचे पालन करुन शर्यती आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रकरणाची आता घटना पिठासमोर सुनावणी होणार आहे. 7 वर्षांनंतर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.