उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सकाळीच पुण्याच्या मावळ तालुक्यात कासारसाई धरण येथे मत्स व्यवसायाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते. पण तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करायला गेले असताना तराफ्याचे इंजिन अचानक बंद पडल्याने अजित पवार आणि इतर सहकारी धरणाच्या मधोमध अडकले. अखेर दुसऱ्या बोटीत रवानगी केल्यानंतर त्यांची सुटका झाली.
…म्हणून तराफ्याचे इंजिन बंद पडले!
कासारसाई धरण परिसरात बऱ्यापैकी मत्स्य व्यवसाय सुरू आहे. याचीच पाहणी करण्यासाठी अजित पवार सकाळी 7 वाजता तिथे पोहोचले. गाडीतून उतरताच त्यांच्यासाठी तराफ्याची सोय करण्यात आली होती. कारण धरणाच्या मधोमध पिंजरा बसवण्यात आला आहे. तिथे पोहोचायचे असेल, तर तराफा किंवा बोटीची मदत घ्यावी लागते. अजित पवारांनाही त्याची कल्पना देण्यात आली होती. पवार पहाटेच पोहोचल्याने तराफ्याच्या मालकालाही घाम फुटला. तराफ्यावर जास्त जणांनी चढू नये, असे सांगूनही कोणी ते मनावर घेतले नाही. अजित पवार आधी तराफ्यावर चढले आणि त्यांच्यापाठोपाठ बरेच लोकही तराफ्यावर चढले. साहजिकच जास्तीच्या भाराने तराफ्याचे इंजिन बंद पडले. खूप प्रयत्न करूनही इंजिन काही सुरू झाले नाही. शेवटी शेजारची बोट जवळ आली आणि अजित पवारांनी पुढच्या प्रवासाला बोटीने सुरूवात केली. या सगळ्यात अजित पवारांचीही चांगलीच दमछाक झाली. इथले पर्यटन म्हणजे खूप कसरत, अशी टिप्पणीही अजित पवारांनी बाहेर येताच केली.
(हेही वाचा : दसरा मेळावा उद्धव ठाकरे ‘असा’ गाजवणार!)
Join Our WhatsApp Community