पालकमंत्र्यांनो जिल्हा सोडून जाऊ नका! अजित दादांच्या सूचना

नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

84

आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे, तसेच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री महोदयांना तसेच लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

जिल्हा प्रशासनाला निर्देश

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून, आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने व दरड कोसळल्याने ज्या गावांचा संपर्क तुटला आहे तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

(हेही वाचाः डोंगर उतारावरील लोकांचे स्थलांतर करावे, महाड दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची वाढली चिंता)

नागरिकांना आवाहन

स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनीही आपत्कालीन परिस्थितीत आपापल्या भागातल्या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचाव व मदतकार्यात सहकार्य करावे. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

संरक्षणमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा

रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन, त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून, सैन्यदलांची अधिकची मदतही देण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी अजित पवार यांना दिले आहे.

(हेही वाचाः कोल्हापुरात पुन्हा हाहाकार!)

अजित दादा काय म्हणाले?

कोयना धरण परिसरातील अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी वाढत असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत:जातीने लक्ष ठेऊन असून, अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून, गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.