विधानसभेत बोलू न दिल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या महाविकास आघाडीचा, आपलेच नेते अजित पवार यांच्यावर अविश्वास आहे का, अशी शंका सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
महाविकास आघाडीच्या ३९ आमदारांनी गुरुवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यासंबंधीचे पत्र विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना देण्यात आले आहे. मात्र, या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. किंबहुना याविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.
अजित पवार म्हणाले, मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठरावाबद्दलची काहीही कल्पना नाही. अध्यक्ष एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशाप्रकारचा अविश्वास ठराव मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली असती तर त्यावर माझी स्वाक्षरी असती. पण मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे.
कोणाकोणाच्या स्वाक्षऱ्या?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सभागृहात बोलू देत नाहीत, असा आरोप करीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी सचिवांकडे अविश्वास प्रस्तावाबाबतचे हे पत्र सुपूर्द केले आहे. या पत्रावर महाविकासआघाडीच्या ३९ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Join Our WhatsApp Community