ज्यांना पुतण्याने पाडले, त्यांना ‘काका’ भेटले! काय आहे (राज)कारण?

शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली.

अजित पवार… राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते. अजित पवार कधी काय करतील, याचा कुणालाच नेम लागत नाही. पहाटेच्या शपथविधीचा महाराष्ट्राने अनुभव घेतला, पण या शपथविधीची संपूर्ण देशात चर्चा झाली. मात्र आता हेच अजित पवार त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी ज्यांचा पराभव केला, त्या राम शिंदे यांना भेटल्याची चर्चा आहे. राम शिंदे यांनी जरी तशी कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगितले असले, तरी दादा खरच भेटले असतील का? आणि जर भेटले तर नेमके का भेटले, याची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भेटीचे कारण काय?

कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पण साखर कारखान्यावरच चर्चा करायची असेल तर भेटीबाबत गुप्तता का? असा सवालही विचारला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात.

(हेही वाचाः मुंबईसमोर समस्यांचा ‘तिढा’, पण गप्प आहेत भाजपचे ‘लोढा’…)

हेच भेटीमागचे ‘नाराज’कारण?

२०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. त्यानंतर राम शिंदे हे पक्षापासून दूर राहत आहेत. तसेच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राम शिंदे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली असताना, त्यांच्यापेक्षा विखेंनाच अधिक मान सन्मान भाजपमध्ये असल्याची सल राम शिंदेच्या मनात आहे. त्याचमुळे भाजपात नाराज असलेल्या राम शिंदे यांच्या भेटीमागे काही वेगळं राजकीय गणीत शिजतंय का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

रोहित पवार समर्थक चकीत

एवढेच नाही तर रोहित पवार यांचे आणि अजित दादांचे फारसे चांगले संबंध नसल्याचे देखील खासगीत बोलले जात आहे. अजित दादांचे चिरंजीव पार्थ पवार हे अजूनही राजकारणात चाचपडत असताना, रोहित पवार मात्र आता राजकारणात स्थिर झाले आहेत. याचमुळे मध्यंतरी पवार कुटुंबात मोठा गृह कलह देखील झाल्याची चर्चा होती. याचमुळे रोहित पवारांनी पराभव केलेल्या राम शिंदे यांना दादा भेटल्याने, रोहित पवार समर्थक देखील चकीत झाले आहेत.

(हेही वाचाः आदित्य ठाकरेंच्या प्रशासकीय कौशल्यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादी हतबल!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here