राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून शरद पवार गटाला अडचणीत आणले आहे. त्यामुळे शरद पवार गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) त्यांचे खाते असलेल्या बँकेला एक पत्र पाठवले आहे. यामध्ये आपल्या परवानगीशिवाय बँकेच्या खात्यातून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी काढल्याने घेतला निर्णय
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली होती तेव्हा ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या बँक खात्यातून 50 कोटी रुपये काढून घेतल्याची चर्चा आहे. तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्याबाबत घडू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार (Ajit Pawar) गटाने बँकेला पत्र पाठवून शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाच्या बँक खात्याशी संबंधित कोणतेही व्यवहार करुन देऊ नयेत, यासाठी बँकेला पत्र पाठवल्याचे समजते.
(हेही वाचा Uddhav Thackeray : अब की बार भाजपा तडीपार; उद्धव ठाकरे यांचा नारा)
बॅलर्ड पिअर कार्यालयही ताब्यात घेणार
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय असलेले बॅलर्ड पिअर येथील कार्यालयही अजित पवार गटाकडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे बँक खाते आणि बॅलर्ड पिअर येथील मुख्यालय अजित पवार (Ajit Pawar) गटाला मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यादृष्टीने कोणत्याही हालचाली घडल्या नव्हत्या. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी बॅलर्ड पिअर येथील राष्ट्रवादीचे कार्यालय आपल्या ताब्यात घेतले जाऊ शकते.
Join Our WhatsApp Community