केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, मग वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय? मुहुर्त बघताय का? असा सवाल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सोमवारी उपस्थित केला.
मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, अजूनही खूप मोठ्या व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत ज्यांना भारतरत्न मिळायचा बाकी आहे. त्यात वीर सावरकर आहेत. गौरवयात्रा काढता, मग कोश्यारी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि इतर महापुरुषांबद्दल भाजपचे मंत्री, प्रवक्ते आमदार यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली; त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आले नाही? त्या महापुरुषांबद्दल का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत? हे निव्वळ राजकारण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सरकारी जाहिरातींविषयी अजित पवार म्हणाले, सरकारकडे सध्या काहीही मुद्दे राहिलेले नाहीत. जसे एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे-सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग करावे लागते आहे. तशा पद्धतीने लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरू आहे, असा हल्लाबोल पवार यांनी केला.
दंगल कुणी घडवली?
आज केंद्र व राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. त्या अनिल बोंडेना सांगा तपास करा. ‘दूध का दूध पानी का पानी’ येऊ द्या लोकांसमोर. वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नावे घेण्यापेक्षा पोलिसांनी दंगल कुणी घडवली ते शोधून काढावे. यामागे कोण सूत्रधार आहे ते समोर येऊ दे आणि जो कुणी दोषी असेल त्याला कडक शासन केले पाहिजे. अजिबात कुणाचा मुलाहिजा बाळगू नका पण त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, असेही अजित पवार यांनी सांगितले.
मोदींच्या पदवीपेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा
- पंतप्रधान मोदींच्या पदवीविषयी विचारले असता पवार म्हणाले, डिग्रीवर काय आहे? आतापर्यंत सुरुवातीपासून देशाचे पंतप्रधान झाले, अनेक मुख्यमंत्री झाले. आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करून निवडून येणाऱ्याला महत्त्व आहे. बहुमत असेल तो प्रमुख होतो. त्यामुळे शिक्षणाच्याबाबतीत वैद्यकीय क्षेत्रात पदवी झाल्याशिवाय काम करु शकत नाही. असे राजकारणात नाही, त्यामुळे ते आज ९ वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत आणि आता डिग्रीचे काढले जाते हा महत्त्वाचा प्रश्न नाही.
- सध्या महत्त्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे. गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी वाढली आहे त्याबद्दल बोलायचं नाही चर्चा करायची नाही. नोकरी कधी मिळणार या आशेवर तरुण आहेत.
- ७५ हजाराची वेगवेगळ्या खात्यात भरती होणार होती. त्याचे काय झाले. शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगार, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते आपण सोडून देतो त्यामुळे डिग्री या विषयाला फार महत्व द्यावे असे मला वाटत नाही असेही अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा – २०१९मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी शिंदेंचे दिले होते नाव, पण शरद पवारांनी….; अरविंद सावंतांचा मोठा गौप्यस्फोट)
Join Our WhatsApp Community