महाविकास आघाडीच्या सरकारबाबत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही आघाडी ५ वर्षे टिकेल किंवा २५ वर्षे टिकेल असे म्हटले होते. आता त्यांनी महाविकास आघाडी बरखास्तीविषयी भाष्य केले आहे. हे सरकार टिकवण्याची जबाबदारी आमच्या तिन्ही पक्षांची आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी सरकारमधून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे, असे वक्तव्य केले, ते त्यांनी असे वक्तव्य का केले, त्या वक्तव्यामागे काय कारण होते, हे आम्हाला माहीत नाही. तसेच त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा आमचा अधिकारही नाही. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी विचारून घेऊ, पण संजय राऊत यांनी कदाचित बंडखोर आमदारांना परत बोलावण्यासाठी हे वक्तव्य केले असावे आणि जरी त्यांनी महाविकास आघाडी बरखास्तीचा निर्णय घेतला, तरी आम्हाला काही अडचण नाही, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
या बंडामागे भाजप असल्याचे दिसत नाही
हे सरकार जेव्हा स्थापन झाले तेव्हा दोन्ही काँग्रेस हे निधर्मीवादी आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करताना किमान सामान कार्यक्रम ठरवण्यात आले होते. राज्यातील विकासकामांवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता. हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्षेप असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत बैठकीत त्यांनी त्यांची मते मांडली पाहिजे होते. सरकार स्थापन करताना काही धोरण ठरवले होते. बंडखोरीसाठी जे आमदार तिथे गेले आहेत ते सगळेच स्वखुशीने गेले असे म्हणता येणार नाही, हा संशोधनाचा विषय आहे. या बंडामागे भाजप आहे, हे अजून दिसत नाही. भाजपचा कोणताही मोठा नेता यात दिसत नाही, त्यामुळे या बंडामागे भाजप असल्याचे आता तरी म्हणता येणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
शिवसेनेत बंड यशस्वी होत नाही
शिवसेनेनेत जेव्हा जेव्हा बंड झाले त्यात नेते एक बाजूला गेले आहेत आणि शिवसैनिक एका बाजूला गेले आहेत. भुजबळ आणि नारायण राणे यांच्याबाबतीत हेच घडले आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते पुन्हा निवडून येत नाही, असे याआधीही उदाहरणे आहेत, असेही पवार म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी स्वतःला गटप्रमुख म्हणून पत्र लिहून पाठवले, त्या पत्राचे काय निर्णय घ्यायचा हे काम विधिमंडळाचे आहे, यावर कदाचित महाधिवक्ता किंवा विधी विभागाचा विचार घ्यायचा असेल तसा विचार घेतला जाईल, असेही पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community