“अजितदादा परत आमच्यासोबत या”, भाजपच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिली साद!

146

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा भाजपसोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे. अहमदनगर येथे एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत विधानपरिषद निवडणूक आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपने खेचून आणलेल्या सहाव्या जागेवरून सुरू असलेल्या वाद-विवादाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटीलांनी अशी अपेक्षा व्यक्त करून नवा वाद निर्माण केल्याचे म्हटले जात आहे.

काय म्हणाले विखे पाटील

‘देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत, तर अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत लवकर येण्याचा निर्णय घ्यावा,’ असेही विखे पाटील म्हणाले. यासह ते पुढे म्हणाले की, देवेंद्रजींनी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – राऊतांकडून आचारसंहितेचं उल्लंघन? कारवाईच्या मागणीसाठी सोमय्या दिल्ली दौऱ्यावर!)

राजकारणात अशी मतभिन्नता असतेच

विखे- पवार परिवारातील संघर्षाबद्दल त्यांना विचारले असता, यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. राजकारणात अशी मतभिन्नता असतेच. आम्ही आमच्या वडिलांच्या विचाराने पुढे जात आहोत. लोणी इथल्या प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाने विखे पाटील यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी विखे यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये विखे पाटील यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

विखे पाटलांनी व्यक्त केली अपेक्षा

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपचे सरकार आणावे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्या सोबत यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.