शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार अखेर पार पडला आहे. या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. कोणाला कोणते खाते मिळणार याबाबत तर्क वितर्क सुरू असताना आता पालकमंत्री पदाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक विधान केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री झाले तर त्यांचं स्वागत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मी पद्धत पाडली आहे त्यामुळे…
सध्या राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार झाला असून अजूनही सगळे बिनखात्याचे मंत्री आहेत. पण खातेवाटपासोबत प्रत्येक मंत्र्याला दोन-दोन पालकमंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री हे सहसा पालकमंत्री होत नसतात. पण उपमुख्यमंत्री पालकमंत्री होण्याची पद्धत अजित पवारने पाडली आहे. त्यामुळे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पालकमंत्री होतील याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नसल्याची मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे.
(हेही वाचाः ‘मंत्रीपदासाठी माझी पात्रता…’, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया)
फडणवीसांचं स्वागत
माझ्या असं कानावर येतंय की देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचं पालकमंत्रीपद हवं आहे. आता ते नागपूरसारखी राज्याची उपराजधानी सोडून पुण्यात येत आहेत, त्यामुळे पुण्याचा एक सुपुत्र म्हणून मी त्यांचं स्वागत करतो, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Join Our WhatsApp Community