पार्थ पवार शिवसेनेच्या ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढवणार? अजित पवार म्हणतात…

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पार्थ पवार यांना आता विधानसभा निवडणुकासाठी पक्षाकडून उमेदवारी देण्यात येईल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचे आमदार असलेल्या कोरेगावमधून भविष्यात पार्थ पवार हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे तर्क लावण्यात येत होते. पण अजित पवार यांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पार्थ पवार कोरेगावमधून निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त खोटं असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अतिरंजित बातम्यांना महत्व नको

पार्थ पवार हे कोरेगाव येथून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा या धादांत खोट्या आहेत. माध्यमांनीही अशा अतिरंजित बातम्यांना महत्व न देता राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. सातारा येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.

(हेही वाचाः पवार म्हणतात, अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील)

कोरेगावमध्ये शिवसेनेचे आमदार

सध्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे महेश शिंदे हे विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले आहेत. शिंदे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळे इथून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे राष्ट्रवादीकडून याआधीही स्पष्ट करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या या विधानानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राऊतांना टोला

नुकतंच राष्ट्रवादीचा खासदार असलेल्या शिरूर येथून पुढच्या वेळी शिवसेनेचा खासदार निवडून येईल, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आणि अनेकांचे डोळे चमकले. पण याचवरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊतांना टोला लगावला आहे, उमेदवारांना तिकीट देण्याचे अधिकार राऊतांना आहेत की, उद्धव ठाकरे यांना?, असा सवाल त्यांनी केला आहे.

(हेही वाचाः उद्या मीही शिवसेनेच्या जागी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करेन, अजितदादांचा राऊतांना इशारा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here