गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील मराठी भाषा भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मराठी भाषेचे महत्व सांगताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत मुख्यमंत्र्यांच्या मराठी भाषेचे कौतुक केले. मुख्यमंत्री हळूहळू बोलत असताना गुदगुल्या करतात आणि समोरच्याचं वस्त्रहरण करतात, असे अजित पवार म्हणाले.
उद्धवजींची मराठी भाषा…
आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या वास्तूचं भूमिपूजन होण, यासारखा चांगला योग असू शकत नाही. प्रबोधनकार ठाक-यांचे विचार आणि त्यांची मराठी भाषा आम्ही पुस्तकातून वाचली. बाळासाहेबांच्या मराठी टोल्यांचे आम्ही साक्षीदार राहिलो. उद्धवजींची मराठी भाषा आम्ही अनुभवतोय. त्यांची मराठी भाषा वेगळी आहे. हळूहळू ते बोलत असताना गुदगुल्या करतात. शालजोडीतून समोरच्याचं वस्त्रहरण करणा-या त्यांच्या मराठी भाषेचं अस्त्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
(हेही वाचाः ‘दादा जिथे तुम्ही आहात, तिथे माझी…’ भर सोहळ्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानं काय झालं वाचा)
आदित्य ठाकरेंचंही केलं कौतुक
उद्धवजींसोबतच आदित्य ठाकरे यांचंही मराठी आम्ही ऐकत आलो आहोत. ते सुद्धा खूप चांगलं मराठी बोलतात. महाराष्ट्राला आपलंसं करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, असं म्हणत अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. तसेच मी हे ठाकरे घराण्याबद्दल बोलत असलो तरी मराठी भाषेचा हा प्रवास महाराष्ट्रातील प्रत्येक घराचा, घरातील प्रत्येक पिढीचा हा प्रवास आहे. मराठी भाषा ही एका पिढीपासून दुस-या पिढीपर्यंत चालत आली आहे आणि ती यापुढेही चालू राहील. कोणी कितीही म्हटलं तरी मराठी भाषा कधीही संपणार नाही, असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
(हेही वाचाः शिवसेना-राष्ट्रवादीत कलह? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं)
Join Our WhatsApp Community