राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ४० आमदारांसह शिवसेना-भाजपा युतीला पाठिंबा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक समीकरणे बदलली असताना, अंबादास दानवेंचे विरोधीपक्ष नेतेपद मात्र वाचले आहे. मनीषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ठाकरे गटाच्या दानवेंचे पद धोक्यात आले होते.
महाराष्ट्र विधानपरिषदेत ठाकरे गटाचे १० आमदार होते. त्यापैकी विप्लव बाजोरिया आणि मनीषा कायंदे यांनी शिवसेनेला समर्थन दिल्यामुळे ही संख्या ८ वर आली. परिणामी राष्ट्रवादीची सदस्य संख्या ठाकरे गटापेक्षा अधिक झाल्याने त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदावर दावा सांगण्याची तयारी सुरू केली होती. विशेषतः एकनाथ खडसे या पदासाठी आग्रही होते.
(हेही वाचा Sharad Pawar : पवारांना आठवले १९८० चे बंड; परदेश दौऱ्यावर असताना ५२ आमदारांनी सोडली होती साथ)
अशावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ४० आमदारांसह शिवसेना-भाजपा युतीला पाठिंबा दिल्यामुळे अंबादास दानवेंनी मोकळा श्वास घेतला आहे. कारण विधानसभेतील ४० आमदारांसह विधानपरिषदेतील ६ आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे एकूण संख्याबळ विभाजित झाल्यामुळे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला जाणार नाही. परिणामी दानवेंचे पद वाचणार आहे.
कोणाचे किती संख्याबळ?
- भाजपा – २२
- शिवसेना – १० (ठाकरे गट ८, शिंदे – २)
- राष्ट्रवादी – ९ (अजित पवार – ६, शरद पवार -३)
- काँग्रेस – ८