राज्यातील विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरुन विरोधी पक्षांमध्येच विरोधाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण असतानाच आता राष्ट्रवादीमध्येही यावरुन दोन मतप्रवाह असल्याचे समोर येत आहे.
काँग्रेससोबतच राष्ट्रवादीला देखील विचारात न घेता शिवसेनेने परस्पर याबाबतचा निर्णय घेतल्यामुळे जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र शिवसेनेच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
जयंत पाटील नाराज
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा सांगितला होता. असे असताना शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपला विरोध दर्शवला आहे. विरोधी पक्षनेत्याची निवड करताना राष्ट्रवादी काँग्रेसला देखील विश्वासात घेण्यात आले नाही. तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून चर्चा केली असती तर महाविकास आघाडीसाठी ते चांगले झाले असते, असे जयंत पाटील यांनी सांगितले. पण दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र शिवसेनेच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.
(हेही वाचाः महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत, काँग्रेसने दिला थेट इशारा! राजकीय वर्तुळात खळबळ)
काय म्हणाले पवार?
ज्याचे सभागृहात संख्याबळ अधिक असते त्याचीच निवड विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी करण्यात येते. आता विधान परिषदेत शिवसेनेचे 12 आमदार आहेत तसेच त्यांना एका अपक्ष सदस्यांचे समर्थन आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विधान परिषदेत प्रत्येकी 10 सदस्य आहेत. यामुळे शिवसेनेने दानवे यांच्या केलेल्या नियुक्तीत काहीही गैर नसून आपला शिवसेनेला पाठिंबा असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावर आता वाद घालण्यात अर्थ नसल्याचेही अजित पवार यांनी सांगत या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Join Our WhatsApp Community