आरं बाबा तुला होणार नाही, पण तुझ्यामुळे दुसर्‍याला होईल त्याचं काय?- कोणाला म्हणाले अजित दादा?

आरं बाबा तुला होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्‍याला होईल त्याचं काय? दरेकर असे कसे तुमचे जुने नेते, असे म्हणत थेट टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. यावेळी तुम्ही मास्क का घातलेले नाही, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधान परिषदेत राज ठाकरे यांना टोला हाणला असून, काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. आरं बाबा तुला कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसर्‍याला होईल त्याचं काय? दरेकर असे कसे तुमचे जुने नेते, असे म्हणत थेट टीका केली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत उत्तर देताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

दरेकरांचे जाकीट बघून कोरोना जवळ गेला नसेल

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे सगळ्यांसाठीच तो चिंतेचा विषय ठरला आहे. दरम्यान, याविषयी राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात देखील उल्लेख केला होता. त्यावर बोलताना विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेमध्ये गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन दिले. यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाची सविस्तर आकडेवारी आणि राज्य सरकारकडून यासंदर्भात केलेल्या आणि केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी अजित पवारांची राजकीय टोलेबाजी पुन्हा ऐकायला मिळाली. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोरोना झाला नसल्याचे सांगतानाच, दरेकरांच्या जाकीटमुळेच त्यांना कोरोना झाला नसेल, असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला!

(हेही वाचाः ‘मंत्र्यांना वाचवा, बाईला नाचवा’ सरकारचा संतापजनक कार्यक्रम!)

राज्यातला मृत्यूदर सुदैवाने घटला आहे. कोरोना झाला तर बऱ्याच लोकांना हॉस्पिटलला जावं देखील लागत नाही. बरेच जण घरच्या घरी औषधं घेऊन बरे होत आहेत. आज देखील आमच्या मंत्रिमंडळातले ७ ते ८ मंत्री आणि दोन्ही बाजूचे काही मान्यवर आमदार कोरोनाग्रस्त आहेत. एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना, प्रवीण दरेकरांना आणि सभापती महोदयांना कोरोना नाही झाला. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल. किंवा प्रवीण दरेकर यांचे जाकीट बघून तो जवळ गेलाच नसेल. म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं, असंही काही झालं असेल तर माहीत नाही, असं अजितदादा म्हणाले.

माझ्या नावावर पावती फाडू नका!

पण तुम्हा तिघांनाही कोरोना होऊ नये अशा आमच्या शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून कोरोना झाला, असे म्हणून माझ्या नावावर पावती फाडू नका, असे म्हणत अजित पवारांनी टोमणा मारला. तितक्यात मागून एका सदस्याने ‘प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जाकीट दिलं, त्यांना कोरोना झाल्याचं’ म्हणताच, अजित पवारांनी “प्रसादने मलाही जाकीट दिलं होते, असे सांगितले.

(हेही वाचाः ‘जय श्रीराम’ ला ममतांच्या विरोध तरी सेनेचा सपोर्ट! )

नुसते आरोप करू नका, पुरावे द्या कारवाई करू

कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यावर जनतेत भीतीचे वातावरण पसरले होते. पण मुख्यमंत्री अजित पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राज्यात सर्व जिल्ह्यांत आणि मुंबईत कोविड सेंटर निर्माण करण्यात आली. खाजगी रुग्णालयेही ताब्यात घेतली. मोठ्या प्रमाणात आरोग्यव्यवस्थेची निर्मिती केली. असे करुनही संकट काळात विरोधकांकडून संशयाच्या नजरेने पाहण्यात आले. उपाययोजना करताना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुरू आहे. पण विरोधकांनी भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचा पुरावा द्या, पुरावा दिल्यावर संबंधितांवर तात्काळ कारवाई करु, असे स्पष्ट केले. या काळात अत्यंत वेगाने आणि कठोर निर्णय घेणे भाग पडले. त्यामुळे त्या काळात काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. राजकारणामुळे त्या बदल्या झाल्या नसल्याचे सांगत विरोधकांचे आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी खोडून काढले.

केंद्राने दिलासा द्यावा

काँग्रेसचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रती बॅरल १०० रुपयांपेक्षा जास्त होते. पण राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव ७० रुपयांच्या आसपास होते. आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रती बॅरल ६० रुपयांपेक्षा कमी आहेत. तरी देशात इंधनाचे भाव १०० रुपये लीटरवर पोहोचले आहेत. राज्यात आकारण्यात येणाऱ्या इंधनातील निम्म्यापेक्षा जास्त रुपये केंद्राकडे जातात. केंद्राच्या टॅक्स आणि करामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव जास्त असल्याचे पवार म्हणाले. तसेच घरगुती गॅसच्या करात वाढ केल्याने देखील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईला आळा घालून सर्व सामान्य नागरिकांना केंद्राने दिलासा द्यावा, अशी सूचना पवार यांनी केली.

(हेही वाचाः भारतीय मुसलमानांना सौदीत ‘नो एन्ट्री’!)

कांदळवनाच्या रक्षणासाठी कठोर पाऊल

मुंबईतील कांदळवने नष्ट करणाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलली जाणार आहेत. काही कांदळवने खाजगी आहेत तर काही शासकीय आहेत. पण कांदळवनामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.

पुतळ्याची उंची वाढवली

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाया बांधणीचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. राज्याची आर्थिक स्थिती हलाखीची असली तरी पुतळ्याचा निधी कमी पडू देणार नाही, असे पवार म्हणाले.

(हेही वाचाः कोविड सेंटरमध्ये रुग्ण महिलेसोबत डॉक्टरने केला घृणास्पद प्रकार… विरोधक सरकारला विचारणार जाब!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here