– जयेश शत्रुघ्न मेस्त्री
ज्याप्रमाणे ’संजय राऊत यांची टीका’ अशा प्रकारच्या बातम्या सामान्य झाल्या आहेत, त्याचप्रमाणे ’अजित दादा रुसले’ असी बातमी सुद्धा सामान्य झाली आहे. संजय राऊत गरज नसताना कधी कोणावर टीका करतील याचा नेम नसतो तसेच अजित पवार कधी नॉट रिचेबल होतील हे स्वतः अजित पवारांना सुद्धा माहित नसावं. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचं नाराजीनाट्य चर्चेत होतं.
अजित पवारांनी ट्विटरवरुन पक्षाचा लोगो हटवला आणि शरद पवारांना अनफॉलो केलं अशा बातम्या झळकल्या होत्या. त्यानंतर यावेळी अजित पवार खरोखर बंड करतील अशी शक्यता सर्वांनाच वाटत होती. मात्र अजित पवार पत्रकारांसमोर आले आणि त्यांनी आपण मरेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं सांगितलं. त्यांच्या या विधानावरुन काही महिन्यांआधीचे एकनाथ शिंदे आठवतात.
(हेही वाचा शिवसेना भवनाच्या अंगणात उभे राहणार शेलार?)
अजित पवारांच्या विधानामुळे पुन्हा एकदा गुवाहाटी पॅटर्न घडेल?
एकनाथ शिंदेदेखील बंड करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेना सोडणार नाही असं ठामपणे सांगितलं. त्यानंतर ते आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आणि तिथे गेल्यानंतरही आपण शिवसेनेतच आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं. आता तर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची झाली आहे. अजित पवारांच्या या विधानामुळे अनेकांना पुन्हा एकदा गुवाहाटी पॅटर्न घडणार असं वाटलं होतं. परंतु असं काही घडेल याची शक्यता नाही. मात्र राष्ट्रवादीमध्ये सब आलबेल आहे, असा समज करुन घेण्याची चूक मुळीच करु नये. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर अशी चर्चा रंगली होती की मुद्दामहुन त्यांना पाडण्यात आलं. हे खरं आहे असं गृहित धरलं तर अजित पवारांचं आणि भारतीय जनता पक्षाचं एकच ध्येय आहे असं आपल्या लक्षात येईल.
अजित पवार कसलेले राजकारणी
भारतीय जनता पक्षाला शरद पवार आणि सुप्रिया पवार यांचा पराभव करायचा आहे. ज्याप्रमाणे राहुल गांधींचा अमेठीत पराभव केला आणि त्यांची राजकीय मान्यता धोक्यात आली. त्याचप्रमाणे शरद पवार आणि सुप्रिया पवार यांचा थेट निवडणुकीच्या रिंगणात पराभव करुन दाखवायचं आहे की पवार यांचा प्रभाव आता संपलेला आहे. काका आणि बहिणीचा पराभव झाल्यावर अजित पवार यांना आपली राजकीय ताकद दाखवता येईल. त्याआधी जर अजित पवारांनी पक्ष सोडला किंवा बंड केलं तर ते बंड फार काळ टिकणार नाही. काही आमदार फोडणे किंवा बंड करणे ही राजकीय पटलावरील सामान्य बाब आहे. पण कोणताही हुशार राजकारणी खूप पुढचा विचार करतो. अजित पवार हे कसलेले राजकारणी आहेत. ते उद्धव ठाकरे नाहीत. केवळ क्षणाचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावणार नाहीत. तर अजित पवार बंड करणार नाहीत, २०२४ ला पवार पिता-पुत्री यांना पराभूत करुनच पुढची खेळी खेळता येणार आहे.
Join Our WhatsApp Community