एकीकडे महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असताना, ‘मविआ’चे प्रमुख नेते तथा विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार शिंदे-फडणवीसांच्या विमानातून भरारी घेणार आहेत. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास ते शिंदे-फडणवीस सरकारच्या विमानाने नागपूरहून मुंबईला रवाना होतील.
अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले आहे. मात्र, नागपूर-मुंबई हवाई सेवेची तिकिटे जवळपास फुल्ल झाली आहेत. त्यामुळे पवार यांनी आपले ‘राजकीय’ मित्र देवेंद्र फडणवीस यांना साद घातली.
मंगळवारी सायंकाळी अजित पवार आणि फडणवीसांमध्ये त्यांच्या दालनात चर्चा झाली. त्यानंतर फडणवीसांनी त्यांच्यासाठी सरकारी विमान उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, अजित पवार बुधवारी दुपारी १ वाजता नागपूरहून मुंबईला रवाना होतील.
( हेही वाचा: ठाकरेंच्या माजी नगरसेवकाला अटक; क्राईम ब्रांचकडून खंडणी आणि सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल )
कारण काय?
- तातडीच्या कारणास्तव अजित पवार मुंबईला जात असल्याचे विरोधीपक्ष नेत्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
- मात्र, शरद पवार यांनी बोलावून घेतल्यामुळे ते लगोलग मुंबईला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
- गेल्या काही दिवसांत सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचे फ्लोर मॅनेजमेंट सपशेल फेल ठरले आहे.
- जयंत पाटील यांचे निलंबन, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा अशा अनेक मुद्द्यावर विरोधक सुरुवातीला आक्रमक झाले, पण काही तासांत त्यांची भूमिका मवाळ झाली.
- त्यामुळे शरद पवार नाराज असून, पुढच्या कामकाजाची रणनीती ठरवण्यासाठी त्यांनी अजित पवार यांना बोलावून घेतल्याचे कळते.
- दरम्यान, अजित पवार थेट सिल्वर ओकवर न जाता तुरुंगातून सुटलेल्या अनिल देशमुख यांच्या वरळीतील घरी जातील. तेथे दोन्ही पवारांची भेट होईल, असे कळते.
- देशमुख यांच्या शेजारच्या इमारतीत अजित पवार यांचे घर आहे. त्यामुळे तेथे ही भेट होऊ शकते.