लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बारामतीच्या लढतीत अचानक प्रवेश करणारे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे. कारण येथील लढत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होणार होती, मात्र विजय शिवतारे यांनीही इथे लढण्याची घोषणा केल्यामुळे अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ झाली. मात्र मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही शिवतारे यांची आव्हानाची भाषा सुरूच आहे. मी जरी माघार घेतली तरी अजित पवार यांचा उमेदवार जिंकणार नाही, असे शिवतारे म्हणाले.
काय म्हणाले शिवतारे?
सोमवार, १८ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंसोबत तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र या भेटीनंतरही शिवतारे यांची भूमिका कायम असून त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर घणाघाती हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, युतीधर्म पाळायला हवा, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. मात्र मी मुख्यमंत्र्यांना गणित समजावून सांगितले आहे. मी जरी लढलो नाही तरी अजित पवार निवडून येणार नाहीत, हे मी त्यांना सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) पवार विरुद्ध सामान्य जनता असा लढा आहे. मी ४-५ दिवस लोकांशी चर्चा करून निर्णय घेतो, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दाबाहेर नाही. मात्र त्याचबरोबर जनतेचा शब्दही तितकाच महत्त्वाचा आहे. सध्या माझीही तब्येत बरी नाही. त्यामुळे मी दोन दिवस इथे उपचार घेऊन त्यानंतर पुण्याला जाणार आहे. तिथे गेल्यावर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार आहे, अशी भूमिका शिवतारे यांनी घेतली आहे.
(हेही वाचा Arvind Kejriwal : ईडीच्या चौकशीकडे केजरीवालांनी पुन्हा फिरवली पाठ)
पक्ष वाढवण्यासाठी सरकारचा पैसा वापरला
“बारामतीत पवारांना हरवण्याची ऐतिहासिक संधी निर्माण झाली आहे. अजित पवारांनी सगळ्यांनाच हैराण केलं आहे, सगळ्यांनाच संपवण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार आता पुण्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी फक्त राजकीय उद्देशातून पुरंदरमधील एका साध्या कार्यकर्त्याला २५ कोटी रुपयांचा निधी दिला. त्याच्याकडे कोणतंही पद नाही. मात्र फक्त आता निवडणूक आहे म्हणून हा निधी देण्यात आला. पक्ष वाढवण्यासाठी ते सरकारचे पैसे वापरत आहेत. याची प्रचिती भाजपसह सर्व पक्षांना पुढील काळात येईल. महायुतीनं अजित पवारांना बारामतीची जागा सोडली तरी त्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत आपण अजित पवारांविषयी मवाळ भूमिका घेणार नसल्याचे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community