राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली राज्यसभेची जागा आपला पक्ष लढविणार आहे. त्यासाठी गुरुवारी (१३ जून) पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि बाबा सिद्दीकी, समीर भुजबळ आणि नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. (Rajya Sabha By-Elections)
सन २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची चार वर्षांची मुदत बाकी असताना फेब्रुवारी महिन्यात पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवली. निवडून आल्यानंतर पटेल यांनी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या २५ जूनला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी संपत आहे. (Rajya Sabha By-Elections)
(हेही वाचा – NDA : लोकसभेत घटले पण राज्यसभेत वाढणार!)
या पार्श्वभूमीवर बुधवारी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राज्यसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून यासंदर्भातील उमेदावाराची घोषणा गुरुवार (१३ जून) ला सकाळी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. या शिवाय अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, माजी खासदार समीर भुजबळ, आनंद परांजपे आणि सातारचे नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होत आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अजित पवार राज्यसभेची उमेदवारी कुणाला देतात, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. (Rajya Sabha By-Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community