अजमेर शरीफ दर्ग्याबाबत (Ajmer Sharif) राजस्थानमधून मोठी बातमी समोर आली आहे. हा दर्गा नसून हिंदू मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच अन्य मागण्यांबाबत हिंदू सेनेने अजमेर जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. अजमेर दर्ग्याला संकटमोचन महादेव मंदिर घोषित करण्यात यावे, पुरातत्व विभागाकडून शास्त्रोक्त सर्वेक्षण करण्यात यावे, दर्ग्यातील अवैध अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हिंदू सेनेपूर्वी महाराणा प्रताप सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजवर्धन सिंह परमार यांनी दर्ग्यात (Ajmer Sharif) हिंदू मंदिर असल्याचा दावा केला होता. यानंतर फेब्रुवारीमध्ये वीर हिंदू सेनेनेही असाच दावा केला होता. दर्गा ज्या कायद्यांतर्गत चालतो, त्याला अवैध ठरवावे, हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार दिला द्यावा आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला या जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
10 ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी
हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी दाखल केलेल्या याचिकेत अजमेर दर्गा (Ajmer Sharif) हे भगवान श्री संकटमोचन महादेवाचे विराजमान मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता याला मंदिर घोषित करावे. तसेच दर्गा कमिटीचे अनधिकृत अतिक्रमण हटवावे. त्यानंतर मंदिरात पूजा करण्यासाठीही परवानगी मागितली आहे. या प्रकरणी 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
Join Our WhatsApp Community