-
विनायक ढेरे
भारतात आज जेव्हा सावरकरांच्या विचारांना फॉलो करणारे सरकार आहे आणि ते केव्हाही पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेऊ शकते, अशी चर्चा भारतातल्याच नव्हे, तर जागतिक पातळीवरील राजनैतिक वर्तुळात सुरू आहे, त्यावेळी अखंड भारताची संकल्पना लवकरच साकार होऊ शकते, असा विश्वास भारतीय नागरिकांना वाटू लागतो.
या विश्वासाला आजच्या मोदी सरकारच्या विशिष्ट राजकीय कर्तृत्वाचा आधार आहे, पण त्याचबरोबर या राजकीय कर्तृत्वामागे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रवादी संघटनेने मान्य केलेल्या अखंड भारताच्या संकल्पनेचा तात्त्विक आधार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नेमकी काय होती अखंड भारताची संकल्पना आणि ती कशी साकार होणार?, याचा धांडोळा घेतला असता काही बाबी ठळकपणे समोर येतात. त्या म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली अखंड भारताची संकल्पना ही केवळ आधुनिक राष्ट्रवादाला भूमी तत्त्वाच्या आधारावर मांडलेली नव्हती, तर तिला आसेतू हिमाचल असा सांस्कृतिक, आध्यात्मिक चेतनेचा आधार होता आणि त्याच वेळी तो राजकीय-सामाजिक व्यवहार देखील होता. सावरकर आधुनिक राजकीय विचारवंत होते. पाश्चात्य राष्ट्रवाद, साम्यवाद, भांडवलशाही या राजकीय संकल्पनांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. पण सावरकरांनी अखंड भारताची संकल्पना केवळ पाश्चात्य राष्ट्रवादाच्या परिप्रेक्ष्यात मांडली नाही, तर त्याला भारतीय तत्त्वज्ञानाची जोड दिली.
अखंड भारताची संकल्पना मांडताना सावरकरांपुढे ब्रिटिशांच्या गुलामगिरीशी टक्कर देणे आणि भारतातील मुस्लिमांचा फुटीरतावाद मोडून काढणे ही दोन आव्हाने होती.
(हेही वाचा MNS : सीमा हैदरवर चित्रपट काढणा-या निर्मात्याला मनसेचा इशारा)
सावरकरांच्या हयातीत ब्रिटिशांशी लढून स्वातंत्र्य मिळवताना मुस्लिमांनी जो फुटीरतावाद दाखविला, त्याला उत्तर सावरकरांच्या अखंड हिंदुस्थान संकल्पनेतून मिळते. जो देश शक, हूण आणि मुघलांच्या आक्रमणात अखंड टिकून राहिला. इस्लामी आक्रमकही ज्याला तोडू शकले नाहीत, तो देश केवळ आधुनिक काळात मुस्लिमांनी मुघली सत्तेचे स्वप्न पाहात फुटीरतावाद अवलंबला म्हणून तुटावा आणि त्याची फाळणी व्हावी, हे सावरकरांसारख्या देशभक्ताला बिलकुल मान्य नव्हते! एकाच वेळी इंग्रजांवर आणि मुस्लिमांमधल्या फुटीरांवर मात करण्याची त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा होती.
पण अखंड भारताची संकल्पना मांडताना सावरकरांनी केवळ भावनाशील राजकारणाचा आधार घेतला नव्हता, तर त्याला राजकीय वास्तवाची देखील जोड दिली होती. त्यामुळे आधुनिक लोकशाही तत्त्वावर आधारित ‘एक व्यक्ती एक मत’ ही संकल्पना पुढे करत अखंड भारतातील सर्व प्रांतांना फुटून निघण्याचा अधिकार वगळून भारतीय राष्ट्र-राज्याच्या चौकटीत स्वायत्तता देण्याची त्यांनी वकीली केली होती. किंबहुना अनुकूल भूमिका मांडली होती.
हिंदू, मुस्लिमांना समान अधिकार
पूर्व बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत, अखंड भारताचा पश्चिम प्रदेश यात मुस्लिमांची लोकसंख्या अधिक आहे या वास्तवाचे सावरकरांना निश्चित भान होते. त्यामुळे तिथली स्थानिक सरकारे मुस्लिम प्रभावाखाली असतील याविषयी सावरकरांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. पण ती तशी असताना देखील तिथल्या हिंदूंचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि घटनात्मक अधिकार कोणत्याही स्थितीत घटता कामा नयेत, हिंदूंना त्यांची संस्कृती, राजकीय स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे, ही सावरकरांची राजकीय व्यावहारिक अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच आपल्या अखंड हिंदुस्थानच्या सीमा अत्यंत प्रबळ अशा सैन्याद्वारे संरक्षित करण्याची त्यांची योजना होती.
पूर्व बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत, अखंड भारताचा पश्चिम भाग येथे मराठा, गोरखा सैन्य पलटणी कायमच्या तैनात करण्याचा त्यांचा आग्रह होता. एकाच वेळी हिंदू आणि मुस्लिमांचे भारतीय नागरिक म्हणून समान सामाजिक आणि राजकीय अधिकार आणि सौहार्द टिकवणे यातून शक्य होणार होते. मुस्लिमांचे अधिकार कमी करून सावरकर हिंदूंना जास्त अधिकार मागत नव्हते, तर हिंदूंच्या अधिकार कपातीतून मुस्लिमांचे लांगूलचालन करणे त्यांना मान्य नव्हते.
सावरकरांना राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण या दोन धोरणांमधून अखंड भारताचे स्वप्न साकार करता येणे शक्य वाटत होते, पण ते त्यांच्या हयातीत शक्य झाले नाही. कारण लोकशाही तत्त्वाच्या आधारे त्यांना या देशाची सत्ता मिळू शकली नाही, अन्यथा आज जे आक्रमक परराष्ट्र आणि संरक्षण धोरण मोदी सरकार राबवत आहे, तेच नेमके धोरण सावरकरांनी त्यांच्या हयातीतच सत्ताधारी म्हणून राबविले असते.
हिंदूंचे सैनिकीकरण अग्निवीर योजना
मोदी सरकारची आजची अग्निविर योजना हा सावरकरांच्या हिंदूंच्या सैनिकीकरणाचाच एक अविष्कार आहे. सावरकरांच्या हिंदू सैनिकीकरणात विद्यार्थ्यांना शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य लष्करी शिक्षण हा महत्त्वाचा भाग होता. त्यातून सैन्यप्रवेश आधुनिक सैन्य प्रशिक्षण या दोन्ही बाबी सावरकरांनी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या होत्या. आज मोदी सरकार त्याच अनुषंगाने अग्निवीर योजनेत तरुणांची भरती करते आहे.
सावरकरांच्या अखंड हिंदुस्थान संकल्पनेत राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या दुबळा हिंदुस्थान बिलकुल अपेक्षित नव्हता, तर तो आक्रमक आणि भक्कम संरक्षक आणि प्रबळ हिंदुस्थान अपेक्षित होता. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच सावरकरांनी अत्यंत व्यावहारिक पातळीवर राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण आणि त्यातून अखंड हिंदुस्थानची संकल्पना ही त्रिस्तरीय योजना तयार केली होती. त्याला राज्यघटनात्मक लोकशाहीची जोड देण्याची त्यांची तयारी होती.
पण त्या काळातला हिंदू समाज आजच्या इतका जागरूक आणि साधन संपन्न नव्हता. त्यामुळे सावरकरांच्या हयातीत त्यांनी मांडलेली अखंड भारताची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. पण आता हिंदू समाज आधीच्या तुलनेत अधिक जागरूक आणि अधिक साधन संपन्न आहे. त्यामुळे अखंड भारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राजकीय व्यावहारिक पावले टाकणे शक्य होत आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे.
(लेखक thefocusindia.com चे संपादक आहेत.)
Join Our WhatsApp Community