साहित्य संमेलन आणि मराठी भाषा शुद्धीकार वीर सावरकरांचा सन्मान

134

नाशिक येथे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. स्वातंत्र्य चळवळीसाठी संपूर्ण आयुष्याचा यज्ञ करणारे, क्रांतीकारकांचे मुकुटमणी आणि मराठी भाषाशुद्धीसाठी महान कार्य करणारे वीर सावरकर यांची कर्मभूमी असलेल्या नाशिक येथे हे संमेलन होत आहे. साहजिकच यामुळे राष्ट्रप्रेमींचा ऊर अभिमानाने भरून आला होता. मात्र ज्यांना साहित्यातही राजकारण दिसते, अशा मंडळींचा यंदाच्या संमेलनावर वरचष्मा आहे. त्यांनी जाणीवपूर्वक या दुग्ध शर्करा योगाकडे दुर्लक्ष केले आणि संमेलनात वीर सावरकर यांचा सन्मान होणार नाही, अशी तजवीज केली आहे. त्यांच्या या मराठी भाषा विरुद्ध कृत्याने न केवळ मराठी साहित्यप्रेमींच्या भावनांचा, तर क्रांतीकारकांच्या बलिदानाचाही अवमान झाला आहे. यातून सावरकरप्रेमींसह राष्ट्रभक्तांमध्ये संतापाची ज्वाळा उसळत आहे. यावर असेच एक स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी, भगूर, नाशिक येथील सावरकर प्रेमी यांनी मांडलेल्या भावना जशाच्या तशा शब्दांत देत आहोत.

5 1

(हेही वाचा वीर सावरकरप्रेमींचा डंका! अखेर बदलले साहित्य संमेलन गीत)

दि. ३, ४ आणि ५ डिसेंबर २०२१ रोजी नाशिक येथे अ.भा.मराठी साहित्य संमेलन ज्या महान व्यक्तीच्या जन्मभूमीत अर्थातच नाशिक येथे पार पडणार आहे, त्याच व्यक्तीचा म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाचा या संमेलनामध्ये आयोजक विचार करणार नाही, हे मात्र आता नक्की होत चाललेले आहे. ‘स्वातंत्र्यानंतर आजही सावरकरांच्या पदरी उपेक्षाच’ या विषयास अनुसरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य क्षेत्रातील असलेल्या योगदानाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

‘साहित्यिक’ या नात्याने सावरकरांनी विविध प्रकार हाताळले. कवी, नाटककार, शाहीर, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रकार, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, इतिहासकार, पत्रकार अशा अनेकविध भूमिकांतून त्यांनी आपली साहित्यसंपदा सृजन केली. सावरकरांनी मराठी भाषेत १००००हून अधिक पाने अन् इंग्रजीत १५००हून अधिक पाने भरेल इतके लिखाण केले. सर्वश्रुत असलेल्या भाषाशुद्धीची त्यांनी चळवळ केली. मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले. मोडी लिपीला प्रोत्साहन दिले. उर्दू भाषेत गझला लिहिल्या. या कामगिरीबद्दल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना नागपूर तसेच पुणे विद्यापीठाने ‘डी.लिट’ पदवी देऊन सन्मानित केले.

(हेही वाचा ‘वीर सावरकरां’चा विसर; नाशिककर आक्रमक)

रत्नागिरी येथे स्थानबध्दतेत असतांना सावरकरांनी ग्रंथाची निर्मिती केली. ‘माझी जन्मठेप’, ‘माझ्या आठवणी’, ‘तेजस्वी तारे’, ‘छत्रपतींचा जयजयकार’, ‘शत्रूंच्या शिबिरांत’ इत्यादी ग्रंथसंपदा निर्माण केली. ‘कमला’ हे अंदमानला रचलेले महाकाव्य लिहून काढले. ‘गोमांतक’, ‘सप्तर्षी’, ‘रानफुले’, ‘सावरकरांची कविता’, ‘कमला’, ‘अग्निजा’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘सावरकरांच्या अप्रसिध्द कविता’, ‘अग्निनृत्य’, ‘कुसुमसंचय’ इत्यादी काव्ये सावरकरांनी लिहिले. या विविध काव्यांतून त्यांनी भव्य कल्पना मांडल्या. सावरकरांचा ‘धन्य शिवाजी तो रणगाजी धन्यचि तानाजी’ हा सिंहगडाचा पोवाडा गाजला आहे. बाजीप्रभूचा पोवाडा’, ‘चाफेकर नि रानडे यांजवर फटका’ हा प्रसिध्द आहे. लेखक, द्रष्टा विचारवंत म्हणून त्यांचे लेख ‘गरमागरम चिवडा’, ‘मराठी साहित्यदर्शन’, ‘रणशिंग’, ‘विज्ञान आणि समज’, ‘क्ष किरणे’, ‘गांधी गोंधळ’ इत्यादी लेख प्रसिध्द झाले आहेत.

Savarkar Kranti

‘दोन शब्दात दोन संस्कृती’ या निबंधात सावरकरांनी हिंदूंच्या शब्द प्रामाण्यावर, श्रुती स्मृति पुराणोक्तावर कडक टीका केली आहे. हिंदु राष्ट्राला काळाच्या तडाख्यातून वाचवायचे असेल तर श्रुती स्मृति पुराणोक्ताची ही बेडी तोडून टाकली पाहिजे आणि हिंदु धर्माला प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम आणि विज्ञाननिष्ठ असे रूप दिले पाहिजे, असा इशारा दिला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेतील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्याच्या कलमामुळे आनंद होऊन सावरकरांनी ‘जन्मजात अस्पृश्यतेचा मृत्युलेख’ हा लेख लिहिला. ‘जात्त्युच्छेदक निबंध’, ‘प्राचीन अर्वाचीन महिला’, ‘अखंड सावधान असावे’ हेदेखील निबंध प्रसिद्ध आहेत.

१९३८ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईत पार पडले होते. या संमेलनाचे भाग्य असे की, माय मराठीच्या उत्सवाला अध्यक्ष म्हणून जाज्वल्य साहित्य निर्मितीचे अग्निकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे लाभले. साहित्य क्षेत्रात सावरकरांचे इतके अफाट योगदान असूनही सरतेअंती त्यांना हेतुपुरस्सर डावलले जाते, ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

पराक्रमाच्या तेजा तुमच्या,  त्रासुनी निंदती जरी घुबडे!
तुमचे पोवाडे गातील, पिढी पिढी नव पुढे पुढे!!

मनोज कुवर
(स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभुमी, भगूर, नाशिक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.