एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार! अजित पवारांची घोषणा

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येच्या विषयावर विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.

113

एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने जी आत्महत्या केली, ही दुर्दैवी आहे. या घटनेची राज्य सरकारने गंभीरतेने दखल घेतली आहे. काल रात्री उशिरापर्यंत मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये हा विषय प्रामुख्याने चर्चेला घेण्यात आला. सरकार ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

न्यायालयीन प्रक्रियेमुळे भरती रखडली! 

आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येच्या विषयावर विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावेळी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना सांगितले कि, एमपीएससीच्या २४ नोव्हेंबर २०१९ रोजी परीक्षा झाल्या. निकाल २२ जुलै २०२० रोजी लागला. ७७८ मुले उत्तीर्ण झाली. मात्र त्याचवेळी एससीबीसी आरक्षण प्रकरणी ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाचा विरोधात निर्णय आला. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी न्यायालयाचा यावर अंतिम निर्णय आला. त्याच वेळी कोरोनाची दुसरी लाट आली.

(हेही वाचा : इथून पुढे मी माझं आयुष्य जगू शकेन असं काहीच उरलं नाही… एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या तरुणाचे अखेरचे शब्द!)

एमपीएससी स्वायत्त असल्याने सरकारला मर्यादा! 

 त्यावेळी एमपीएससीने परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. एमपीएससी हे स्वायत्त आहे. त्यामुळे त्यावर अधिक नियंत्रण ठेवता येत नाही. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे यात अडथळे आले. तरीही स्वप्नीलने असे कृत्य करणे अपेक्षित नव्हते. सरकारने या घटनेची गंभीरतेने दखल घेतली आहे. मंत्रिमंडळात यावर चर्चा झाली. ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा सरकार भरणार आहे. तसेच स्वप्नीलच्या आई-वडिलांनाही अर्थसहाय्य केले जाईल, असेही आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

काय म्हणाले विरोधक? 

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले कि, आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिली पण स्वायत्तता म्हणजे सैराचार नाही. सरकारने आणखी स्वप्नील निर्माण होणार नाही, यासाठी तातडीने व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. सरकारला स्वप्नीलसारख्या तरुणाने आत्महत्या केली काय किंवा नाही केली काय, त्याचे काहीही देणेघेणे नाही. विद्यार्थ्यांनी किती आंदोलने करायची, असे फडणवीस म्हणाले. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, निवृत्ती झालेल्या अधिकाऱ्याना आपण आपण मुदतवाढ देतो पण स्वप्नीलसारख्या विद्यार्थ्यांचे काय? 430 विद्यार्थ्यांनी आम्ही सुद्धा आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे. कालपासून 100 च्यावर विद्यार्थ्यांनी आम्हाला फोन करून हा विषय मांडा असे म्हटले आहे. स्वप्नीलच्या आई-वडिलांच्या व्यथा नीट ऐका, त्याच्या पालकांना ५० लाख रुपयांची भरपाई द्या, अशी मागणी केली.

(हेही वाचा : विधानभवनाबाहेर विरोधक आक्रमक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.