कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत मुंबई महापालिकेने आणखी एक मैलाचा टप्पा पार केला असून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी पहिली मात्रा घेतल्याची नोंद कोविन या राष्ट्रीय लसीकरण संकेतस्थळावर झाली आहे. या लसीकरण मोहिमेअंतर्गत ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांना पहिली मात्रा देण्याचे निर्धारित लक्ष्य होते. ते शनिवारी पूर्ण झाले आहे.
पहिल्या मात्रेचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण
जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण (दोन्ही मात्रा मिळून) करावयाचे आहे. पैकी आज दुपारी १२ वाजेपर्यंत ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी पहिली मात्रा घेतल्याची नोंद कोविन या राष्ट्रीय लसीकरण संकेतस्थळावर झाली आहे. म्हणजेच पहिल्या मात्रेचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाले आहे.
(हेही वाचा : दंगलीची जबाबदारी सरकारचीच!)
आता दुसऱ्या मात्रेचे उद्दिष्ट
सर्व संबंधित पात्र नागरिकांनी कोविड लसीची दुसरी मात्रा देखील घेवून लसीकरण पूर्ण करावे यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा आणि जनजागृती करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे ५९ लाख ८३ हजार ४५२ मुंबईकरांनी दुसरी मात्रा घेतल्याची नोंद झाली आहे. पहिल्या मात्रेचे लक्ष्य पूर्ण झाल्याने आता दुसऱ्या मात्रेचे उद्दिष्टही लवकरात लवकर गाठण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दुसरी मात्रा देय असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, असे विनम्र आवाहन या निमित्ताने महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community