टिपू सुलतानचे नाव हटवण्यासाठी मालाडच्या सर्वच शिवसेना नगरसेवकांनी केली ‘ही’ मागणी…

112

मालाडमधील मैदानाचे नामकरण टिपू सुलतान असे करण्यावरून माजलेल्या वादंगानंतर आता मैदानाचे नामकरण झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान असे करण्याचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीला प्राप्त झाले आहे. उपमहापौर वापी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षांनीच नव्हे तर मालाडमधील सर्वच नगरसेवकांसह शिवसेनेच्या विभागाप्रमुखानेही या मैदानाच्या नामकरणासाठी पत्र दिले असून यामध्ये कांदिवलीतील शिवसेना नगरसेवकानेही प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे वादग्रस्त टिपू सुलतानच्या नामकरणावरून उठलेल्या वादानंतर शिवसेनेने आपल्या सर्वच नगरसेवकांना मैदानावर उतरवले आहे. त्यामुळे या मैदानाच्या नामकरणाचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलेले

मालाडमधील मैदानाचे नुतनीकरण केल्यानंतर स्थानिक आमदार व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी याठिकाणी टिपू सुलतान असा नामफलक लावला होता. यावरून मोठे वादळ उठले होते आणि याला भाजपने तीव्र विरोध केला होता. टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मैदानाची नामकरण झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान असे केले जाईल, अशी घोषणा केली होती. या मैदानाचे नामकरण झाशीची राणी लक्ष्मीबाई अशाप्रकारे करण्यासाठी पी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार यांनी महापौरांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यानुसार सुतार यांचे पत्र महापौरांनी बाजार व उद्यान समिती अध्यक्षांकडे पटलावर घेण्यासाठी पाठवले होते. सुतार यांच्यानंतर कांदिवलीमधील शिवसेना नगरसेवक एकनाथ हुंडारे, शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, शिवसेना नगरसेविका गीता भंडारी, शिवसेना नगरसेविका विनया सावंत व उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांनीही महापौर तसेच बाजार व उद्यान समिती अध्यक्षांना उद्देशून लिहिली आहेत. यामध्ये त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी १९ व्या शतकातील स्त्री असतानाही त्या सौदामिनीने आत्मविश्वासाने, स्वकर्तुत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य लढा दिला आणि आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासात उमटवला. अशा थोर विरांगनाचे नाव मालवणीतील नगर भू क्रमांक २८४१ येथील खेळाच्या मैदानाला दिल्यास आजच्या स्त्रीला ते अत्यंत प्रेरणादायी ठरेल,असे म्हटले आहे. त्यामुळे या मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान असे नाव देण्यात यावे अशी शिफारस सर्वच नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी यांनी केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ हुंडारे हे कांदिवली येथील नगरसेवक असून त्यांनीही या नामकरणासाठी पत्र दिले आहे. दरम्यान, नामकरणाचे हे सर्व प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायसाठी बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी पाठवून दिले आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या अभिप्रायनंतर नामकरणाची पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

(हेही वाचा महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये? सत्ताधारी पक्षानेच दिले ‘असे’ संकेत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.