राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) उमेदवारांनी अर्ज भरण्याची अंतिम मुदत गुरुवार, १५ फेब्रुवार आहे. त्याआधी भाजपने ३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा उमेदवार दिला आहे. तर अजित पवारही त्यांचा उमेदवार जाहीर करणार आहेत. अशा प्रकारे महायुतीचे पाच उमेदवार असणार आहे. तर काँग्रेसने १ उमेदवार दिला. अशा प्रकारे राज्यसभेतील महाराष्ट्राच्या कोट्यातील सहाही उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.
कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही चौथा उमेदवार देणार नाही, असे जाहीर केल्यामुळे सहा जागा बिनविरोध निवडून येणार आहेत.
कोणत्या पक्षाने कुणाला दिली उमेदवारी?
भाजपच्या यादीमध्ये बुधवारी, १३ फेब्रुवारी रोजी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर (Rajya Sabha Election) संधी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह भाजपा नेत्या आणि आमदारकीवेळी आपली जागा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनाही भाजपाने संधी दिली आहे. तसेच डॉ. अजित गोपछडे यांनाही संधी मिळाली आहे. भाजपाने आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केल्यामुळे आता भाजपाकडून तीनच जागा लढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून माजी खासदार व काँग्रेसमधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून बाबा सिद्दिकी यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. अशा प्रकारे या सहाही जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहे.
Join Our WhatsApp Community