पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी काश्मीर भेटी दरम्यान भारतीय लष्करी जवानांचा गणवेष घातल्या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या जिल्हा न्यायालयाने पंतप्रधान कार्यालयाला नोटीस बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा दौऱ्यात लष्कराचा गणवेष परिधान केला होता. लष्कराचा गणवेष परिधान करणे हा आयपीसीच्या कलम 140 नुसार दंडनीय गुन्हा आहे, असा दावा करणारी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 2 मार्चला होणार आहे.
काय आरोप झाला मोदींवर…
कलम 153 (3) अन्वये अर्ज देऊन अधिवक्ता राकेश पांडे यांच्या वतीने प्रयागराजच्या जिल्हा न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी पंतप्रधान कार्यालयाला नोटीस बजावली आहे. अर्ज दाखल करून पीएम मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 4 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधानांनी नौशेरा, जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा गणवेष परिधान केला होता, असा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
(हेही वाचा – ‘पर हम झुकेंगे नहीं!’ संजय राऊतांनी का केले ‘पुष्पा’ स्टाईलने ट्वीट?)
न्यायालयाने पंतप्रधान कार्यालयाला बजावली नोटीस
पांडे यांनी दाखल केलेला अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी हरेंद्र नाथ यांनी 21 डिसेंबर 2021 रोजी नाकारला होता. न्यायदंडाधिकारी म्हणाले होते की, ही घटना न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर घडली आहे. या प्रकरणाची सुनावणी त्या क्षेत्रातील न्यायदंडाधिकार्यामार्फत केली जाऊ शकते. त्यानंतर पांडे यांनी या आदेशाला जिल्हा न्यायाधीशांसमोर आव्हान दिलं. यावेळी जिल्हा न्यायालयाने पंतप्रधान कार्यालयाला नोटीस बजावली आहे.