शेलार-मलिकांमध्ये रंगतंय ‘फोटोवॉर’!

त्रिपुरा घटनेचे तीव्र पडसाद उमटून महाराष्ट्रातील नाशिक, अमरावती आणि नांदेड जिल्ह्यात हिंसाचार झाला. अमरावतीमध्ये झालेली हिंसा हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, अनिल बोंडेंनी हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. तसेच रजा अकादमीच्या कार्यालयात आशिष शेलार काय करतात? त्याचा फोटो माझ्याकडे आहे, असा आरोप मलिकांनी केला आहे.

काय म्हणाले मलिक ?

अमरावतीत दंगल पेटवण्यासाठी दारु, पैसे वाटण्यात आले. त्यासाठी मुंबईतून पैशांचा पुरवठा करून ते पैसे लोकांना वाटण्यात आले. अमरावती शहरात दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. पोलीस तपासात हे उघड झालं त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली. सर्व अस्त्र संपल्यानंतर भाजपा दंगलीचं हत्यार बाहेर काढते. भाजपा दंगलीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकारण खेळत आहे. महाराष्ट्राची जनता भाजपाच्या या राजकारणाला कधीच स्वीकारणार नाही. अमरावतीबाहेर कुठेही हिंसाचार घडला नाही. समुदायात तेढ निर्माण करण्याचं राजकारण महाराष्ट्राच्या जमिनीवर चालणार नाही असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

( हेही वाचा : अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजप नेते अनिल बोंडेंना अटक )

…तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही

नवाब मलिक यांच्यावर मलिकांनी केलेल्या आरोपावर प्रतिउत्तर देताना भाजपा नेते आशिष शेलार म्हणतात, नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण, पूर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे आहे. अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या दंगलीचा आणि सन २०१६-१७ च्या फोटोचा संबंध काय? असा सवाल शेलारांनी केला आहे. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादीने फोटोचं राजकारण बंद करावे. असा इशारा शेलारांनी नवाब मलिकांना दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here