जेव्हा पासून महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा पासून ते चर्चेत असून आता या सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे, तरी महाविकास आघाडी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी त्यांच्या नाराजीनाट्यामुळे, तर कधी मंत्र्यांच्या अर्थहीन वक्तव्यावरून तर कधी, नेत्यांवर होणाऱ्या आरोपांवरून.. मात्र आता महाविकास आघाडीतील कित्येक मंत्र्यांवर असे आरोप करण्यात आले की त्यांची ओळख महाविकास आघाडीत डागाळलेले मंत्री म्हणून केली जात आहे. जाणून घ्या कोणते आहेत महाविकास आघाडीतील ते डागाळलेले मंत्री…
1. नवाब मलिक
मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले, त्यानंतर 8 तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदीचा आरोप करण्यात आला आहे. कुर्ल्यातील मोक्याची 3 एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्याचा आरोपही मलिकांवर करण्यात आला आहे. 30 लाखांतील जमीन खरेदीपैकी 20 लाखांचं पेमेंट केल्याचा आरोपही मलिकांवर करण्यात आला आहे. मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं 2005 मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप आहे. यासह 2005 मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव 2053 रु. स्क्वेअर फूट होता मात्र खरेदी 25 रु. स्वेअर फुटांनी केली. जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची असल्याने सध्या मलिक हे पुन्हा चर्चेत आले आहेत.
2. बच्चू कडू
राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने 11 फेब्रुवारी रोजी दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये बच्चू कडूंविरोधात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रूपयांच्या मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 निवडणुकीच्या वेळी या फ्लॅटची माहिती निवडणूक आयोगाला दिली नसून ती माहिती लपवून ठेवली. असा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. या आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने बच्चू कडू यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठवला. तसेच 2 महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली.
3. धनंजय मुंडे
ठाकरे सरकारमधील महत्वपूर्ण नेतेपद म्हणजे सामाजिक न्यायविभाग खातं. हे खातं धनजंय मुंडे यांच्याकडे आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी बलात्काराच्या आरोपामुळे ते चर्चेत आले होते. त्यांच्यावर एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे. त्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करत, मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता. त्या महिलेच्या तक्रारीनुसार, 2006 मध्ये करुणा (धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी) प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेल्या असता, आपण घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहित होते. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत, प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच धनंजय मुंडेंनी माझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. यानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा करत हे सर्व आरोप खोटे असून, माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहेत, असे म्हटले आहे.
4. जितेंद्र आव्हाड
फेसबुकवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अनंत करमुसे या इंजिनिअरला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात बेदम मारहाण केल्याची तक्रार, सदर इंजिनीअरने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या मारहाणीच्या वेळी आव्हाड हेही बंगल्यात उपस्थित होते, असे त्यांचे म्हणणे होते. जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 कार्यकर्त्यांना अटक करत, या 5 ही कार्यकर्त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. या मारहाण प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपकडून जोरदार आरोप झाले. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती. तसेच राज्यपालांसोबत घेतलेल्या भेटीमध्ये, भाजपच्या नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
5. यशोमती ठाकूर
ठाकरे सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या यशोमती ठाकूर यांना आठ वर्ष जुन्या प्रकरणात यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारणे, काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांना भोवले होते. या प्रकरणी त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ, पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ मार्च २०१२ रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत घालणे आणि मारहाणीचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने, यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यासह त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले. याप्रकरणी साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे. सरकारी कामात अडथळा आणि पोलिसाला मारहाण प्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना, तीन महिन्यांचा कारावास आणि १० हजार १०५ रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश उर्मिला फडके (जोशी) यांनी सुनावली होती.
6. संजय राठोड
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात संजय राठोड हे वनमंत्री होते. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पूजा चव्हाणच्या फोनमधील संभाषण पोलिसांना तपासल्यानंतर त्यातील संभाषण हे राठोड यांचे असल्याचा दावा करणारे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून थेट संजय राठोड यांच्यावर आरोप केला होता. यानंतर राठोड यांनी माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळं समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला होता. परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारी 2021 ला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.
7. आदित्य ठाकरे
ठाकरे सरकारमधील युवा मंत्री असलेले पर्यावरण मंत्री हे देखील आरोपांपासून सुटलेले नाहीत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यपक्षपणे आरोप करण्यात येत होते. बिहार भाजपने तर थेट आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची नार्को चाचणी करण्याची मागणी केली होती. तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी देखील सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि दिशा सालीयन प्रकरणात, एका युवा मंत्र्याचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे सगळीकडून होणाऱ्या अप्रत्यक्ष आरोपांनंतर आदित्य ठाकरे यांनी एक पत्र लिहीत खुलासा केला होता. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत, हा काही गुन्हा नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.
(हेही वाचा – ईडी हाताळत असलेली हाय प्रोफाईल प्रकरणे! ‘हे’ आहेत घोटाळ्यांचे ‘नवाब’?)
8. प्रताप सरनाईक
भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. एवढेच नाही तर ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते. त्यानंतर मुंबईत आलेल्या सरनाईक यांचा क्वारंटाईनचा काळ संपताच ईडीने त्यांची चौकशी केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तर ठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन, अनधिकृतपणे इमारत बांधल्याचा आरोप त्यांच्यावर केला. सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते. प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. यात टॉप सिक्युरिटीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा ईडीने केला होता. या प्रकरणी MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा ईडीने न्यायालयासमोर केला होता. पण, टॉप्स सिक्युरिटीच्या १७५ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे MMRDA चा अहवाल सादर करण्यात आला होता. यात MMRDA ने दाखल केलेल्या अहवालात कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा उल्लेख केलेला नाही.
9. अनिल देशमुख
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे.
पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते. या प्रकरणी ईडीकडून अनिल देशमुखांना अनेक समन्स देखील बजावण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community