मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी वाझेनीही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझेने एनआयएला एक पत्र लिहिले आहे. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यावर परब यांनी बुधवारीच ७ मार्च रोजी याचा खुलासा करत सर्व आरोप फेटाळून लावले.
काय म्हणाले मंत्री अनिल परब?
मी हे सर्व आरोप फेटाळत आहे. मी माझे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या अतिप्रिय असणाऱ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो कि हे सर्व आरोप खोटे आहेत. मला नाहक बदनाम केले जात आहे. भाजपच्या लोकांनी हे प्रकरण तयार केले आहे. त्याचमुळे हे सांगत होते कि, आम्ही या सरकारची तिसरी विकेट घेणार आहे. माझ्यावर आणि अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्यावर दोन आरोप केले यावर माझा कसलाही संबंध नाही. मी आज कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम केले जात आहे. ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले त्यांना वस्तुस्थिती कळावी यासाठी मी आपल्या समोर आलो आहे.
(हेही वाचा : शेट्टी घेणार महाविकास आघाडीशी ‘कट्टी’!)
काय केले आहेत आरोप वाझेने!
- जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावले होते. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसआधी परब यांनी सुरूवातीला SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितले. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUT ५० कोटी रुपये मागितले होते. हे काम करण्यास आपण असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला SBUTबद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर चौकशीवरही आपल कोणतेही नियंत्रण नव्हते.
- जानेवारी २०२१ मध्ये मंत्री अनिल परब यांनी पुन्हा आपल्याला शासकीय बंगल्यावर बोलावले आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करण्यास सांगितले. अशा ५० ठेकेदारांकडून २ कोटी रुपये वसूल करण्यास त्यांनी सांगितले होते. अज्ञात तक्रारींच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. ठेकेदारांविरोधातील तक्रारींची गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखा अर्थात क्राईम इंटेलिजन्स विभागाने केलेल्या तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही.