महाराष्ट्र बंद : ‘बेस्ट’च्या बसगाड्या आगारातच फोडल्या?

बंद रविवारी मध्यरात्रीपासून सुरु झाला. त्यानंतर लागलीच बेस्ट प्रशासनाने नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदाराच्या ८ बसगाड्यांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.

118

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हल्ल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली. सोमवारी सकाळपासूनच बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली. मुंबईत बंद यशस्वी करण्यासाठी सरकारी आणि निम शासकीस कार्यालयातील सेनेच्या अधिपत्याखालील संघटनांनी जबरदस्तीने बंद करण्यास सुरुवात केली. मुंबईतील बेस्टच्या आठ बसगाड्या फोडल्याच्या घटना घडल्या. मात्र या बसगाड्या जाणीवपूर्वक फोडण्यात आल्या का, अशी चर्चा सुरू झाली. या गाड्या आगारात आणि आगाराच्या परिसरातच फोडण्यात आल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांनी यासंबंधी आपल्याला माहिती नसल्याचे म्हणाले.

‘बेस्ट’च्या ८ बसगाड्यांची तोडफोड

हा बंद रविवारी मध्यरात्रीपासून सुरु झाला. त्यानंतर लागलीच बेस्ट प्रशासनाने नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदाराच्या ८ बसगाड्यांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या. यातील बहुतांश गाड्या ह्या आगाराच्या परिसरात तोडण्यात आल्या. या गाड्या नियोजनपूर्वक फोडण्यात आल्या, असा आरोप होत आहे. बेस्टमधील शिवसेना पुरस्कृत कामगार सेना आणि काँग्रेस पुरस्कृत इंटक संघटना यांनी बंदला पाठिंबा दिला. दरम्यान या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाने पोलिस संरक्षणात सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, तसे पत्र सरकारला पाठवले, मात्र प्रत्यक्षात पोलिस संरक्षण पुरवण्यात आले नाही.

(हेही वाचा : दादरमध्ये पोलिस दुकाने बंद करतायेत, हा शासन पुरस्कृत बंद! मनसेचा घणाघात)

सरकार पुरस्कृत बंदमुळे ‘बेस्ट’ ठप्प

दरम्यान आजचा बंद हा महाविकास आघाडीने पुकारल्यामुळे हा बंद यशस्वी करण्यासाठी सरकारी सेवांच्या अधिका-यांना सरकारी पातळीवरून आदेश देण्यात आले होते. त्यामुळेच बेस्ट प्रशासनाने पोलिस संरक्षणात बेस्ट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारला पत्रही पाठवले. मात्र संरक्षण पुरवण्यात आले नाही. याआधी कितीही गंभीर परिस्थिती आली, तरी बेस्ट सेवा बंद पडली नाही. यावरून हा बंद शासन पुरस्कृत असल्यामुळे बेस्ट सेवा ठप्प करण्यात आली, अशीही चर्चा सुरू झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.