कांदिवली पूर्व द्रुतगती महामार्गावर आकुर्ली रेल्वे स्टेशनसमोर १४ हजार चौरस फूट जागेत भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून बसवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असताना महाविकास आघाडी सरकारचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी ऐनवेळी पुतळ्याच्या अनावरणाला परवानगी नाकारली. या संदर्भात खासदार गोपाळ शेट्टी क्रीडामंत्री सुनील केदार यांची भेट घेण्याकरीता जात असताना आझाद मैदान पोलिसांनी त्यांना अटक केली. खासदार गोपाळ शेट्टी यांना त्वरीत सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेच्या शीतकालीन सत्रात केली.
जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण
माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व परवानगी प्रकिया पूर्ण करण्यात आली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारचे क्रीडामंत्री सुनील केदार यांना परवानगीविषयी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अनेक पत्रे पाठविली होती. देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबर रोजी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याचे ठरविले होते.
( हेही वाचा : अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! आता पुढे काय? )
दुदैवी बाब
सर्व परवानगीसाठी गोपाळ शेट्टी यांनी पाठपुरावा केला, आवश्यक कागदपत्र संबंधित विभागांना पोहचविले. केंद्राकडून सर्व परवानगी मिळाली असून नेमके पुतळ्याच्या अनावरण दिवसाच्या पूर्वसंधेला, म्हणजेच २४ डिसेंबर रोजी सुनील केदार यांनी ही परवानगी नाकारली असून ही दुर्दैवी बाब आहे. या संदर्भात बैठक घेऊन २४ तासांच्या आत पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेच्या शीतकालीन सत्रात केली.
Join Our WhatsApp Community