विदर्भातील ‘अंभोरा’ जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ होणार! २ हजार तरुणांना नोकरीची संधी

104

नागपूर -उमरेड मार्गावर असणाऱ्या अंभोरा या प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करण्याकरता सिंचन विभागातर्फे 200 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असून गोसीखुर्द बॅकवॉटर मध्ये कॅप्सूल लिफ्ट , हॉटेलिंग , क्रूज टुरिझम , जेट्टी प्रवास , जलपर्यटन यासारख्या उपक्रमातून अंभोरा हे जागतिक दर्जाचे आकर्षण असणारे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल. या पर्यटन प्रकल्पामुळे येथील 2,000 तरुणांच्या हातांना काम मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण -एनएचएआय द्वारे नागपूर उमरेड या राष्ट्रीय महामार्ग – 353 डी च्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते उमरेड बायपासजवळील योग भवन येथे आयोजित कार्यक्रमात झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमरेडचे आमदार राजू पारवे प्रामुख्याने उपस्थित होते.

( हेही वाचा : दिलासादायक! कॅन्सरवर करता येणार मात; शास्त्रज्ञांनी शोधले किमोथेरपीपेक्षा प्रभावी तंत्रज्ञान)

‘ग्रीन रोड ‘

उमरेड ते नागपूर हा रस्ता ‘ग्रीन रोड ‘ म्हणून तयार करण्यासाठी एनएचएआय तर्फे रस्त्याच्या 3 मीटर अंतरापर्यंत वृक्षारोपण करण्यात येणार आहे . या मार्गामुळे नागपूर बरोबरच उमरेड भिवापूर ,आरमोरी या ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे . या रस्त्यामुळे कोळसा, कृषीमाल यांची वाहतूक सुलभरीत्या होणार असून यामुळे येथील उद्योग विकासाला चालना मिळणार आहे .हा महामार्ग विकासाचा ठरणार असून यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. उमरेड , भिवापूर , कुही या ठीकाणी आर्थिक संपन्नता येईल असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे तलाव खोलीकरणाच्या कामातून रस्त्यांचे दर्जेदार कामे पश्चिम विदर्भात झाली . त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यात सुद्धा मांगली , हळदगाव, वडेगाव , उकडवाही पांढराबोडी या सहा तलावातून खोलीकरण झाल्याने उमरेड भागातील शेतकऱ्यांना 1 लाख 672 क्युबीक मीटर एवढा जलसाठा उपलब्ध झाला असून यातून सिंचन व पेयजलाची सुविधा निर्माण होणार आहे . अशी माहिती गडकरी यांनी दिली . उमरेड शहरासोबतच उमरेड -भिवापूर या रस्त्याचे चौपदरीकरण सुद्धा आपण करू . उमरेड ते बुटीबोरी या रस्त्याकरिता केंद्रीय रस्ते निधीतून 20 कोटी रुपये देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले . नागपूर -उमरेड – वडसा – चंद्रपूर – गोंदिया या मार्गावरील ब्रॉडगेज मेट्रोच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून या कामाला सुद्धा काही महिन्यात प्रारंभ होईल . 140 किलोमीटर प्रति तास या ब्रॉडगेज मेट्रोचा वेग असून नागपूर ते उमरेड हे अंतर केवळ 25 मिनिटात पार करणे शक्य होईल असेही त्यांनी सांगितले . उमरेड ते नागपूर या चौपदरी रस्त्यावर रस्ता सुरक्षा च्या हेतूने सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमरेड ते नागपूर हा एक आधुनिक आणि गतिशील असा रस्ता असून रस्ते हे विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात विकासात कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते असे त्यांनी सांगितले .नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला गडचिरोली , गोंदीया पर्यंत आपण नेणार आहोत . याचे उद्घाटन सुद्धा जानेवारीत करू असे त्यांनी सांगितले . नागपूर ते गोवा दरम्यानचा रस्ता मराठवाडा कोल्हापूर या भागातून जाणारा एक्सेस कंट्रोल रोड असल्याने . या भागात लॉजिस्टिक हब उदयास येतील . अंभोरा येथील पर्यटन केंद्र तयार करण्याच्या उद्देशाने नियामक समितीच्या बैठकीत 200 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला देऊन पर्यटनाचे मोठे सर्किट या ठिकाणी आपण तयार करू असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले .याप्रसंगी उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी उमरेड तालुक्यातील ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प ,शहरातील रस्त्यांना बाह्य वळण रस्ताजोड , भिवापूर रस्ता , कुही ते बुटीबोरी रस्ता , अंभोरा पर्यटन स्थळ या प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देण्या संदर्भात लक्ष वेधले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी , नागपूर तसेच उमरेड जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, उमरेड भिवापूर , कुही येथील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.