स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, द्रष्टे विचारवंत, कवी, साहित्यिक, भाषा सुधारक म्हणून सुपरिचित आहेत. पण त्यांनी शाळेत असल्यापासून ते पुणे, मुंबई, लंडन येथे शिकत असताना व नंतर अंदमानच्या कारागृहातून आणि पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर केलेली जाज्वल्य पत्रकारिता हा त्यांच्या चरित्रातील अल्पपरिचित असा पैलू आहे. नेमका हाच पैलू पत्रकारितेचे अभ्यासक देवेंद्र भुजबळ उलगडणार आहेत. तेही थेट अमेरिकेच्या शिकागो येथे.
२८ मे रोजी सावरकर जयंती असते. या जयंतीच्या निमित्ताने साहित्य कट्टा, इतिहास मंच आणि महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ३० मे २०२३ रोजी संध्याकाळी ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र मंडळ, शिकागोच्या कार्यकारिणीने कोरोना काळामध्ये अनेक उपक्रम सुरू केले, त्याचा श्री गणेशा ‘साहित्य कट्टा’ या ग्रुपने झाला. शिकागो विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापिका व नामवंत साहित्यिक डॉ. सुजाता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘साहित्य कट्टा’ व ‘बोलका कट्टा’ ही रोपे लावली गेली. ‘साहित्य कट्टा’ मागचे उद्दिष्ट प्रामुख्याने अमेरिकेत मराठी भाषेची जोपासना करून वाचन-लेखनाद्वारे ती वृद्धिंगत करणे, सभासदांच्या मनात मराठी साहित्याविषयी गोडी निर्माण करणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या साहित्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ देणे, ज्यांच्यात साहित्यिक दडला आहे त्याला जागृत करणे आणि अर्थातच उत्तम कार्यक्रम आयोजित करून श्रोत्यांचे मनोरंजन करणे हे आहे. ‘साहित्य कट्टा’ वरील बरेच सभासद ‘रचना’ या अंकात आपले साहित्य प्रसिद्ध करतात.
Join Our WhatsApp Community