अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार; थेट विमान सेवेला सुरुवात

192
मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. शिवाय अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले.
एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. केंद्रीय नागरी विमान उड्डाण विभागाचे सचिव राजीव बन्सल, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्बेल विल्सन आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, मुंबई येथून सुरू झालेली ही थेट सेवा आतापर्यंतची सर्वांत लांब अंतराचा हवाई प्रवास आहे. आठवड्यातून तीन वेळेला ही सेवा असून त्यानंतर ती दररोज सुरू होईल. सॅनफ्रान्सिस्को आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असून भारतीय पर्यटकांना थेट सेवा फायदेशीर ठरणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ती महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनानंतर आता आंतरराष्ट्रीय प्रवासात वाढ झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चोवीस तासांत दीड लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो लोक अमेरिकेत स्थायिक असून या सगळ्यांचे हवाईसेवेच्या माध्यमातून जोडणाऱ्या एअर इंडियाशी वेगळ नातं निर्माण झालं आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन – शिंदे

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. पंतप्रधानांमुळे महाराष्ट्राला देखील जी २० परिषदेच्या बैठकांचा मान मिळाल्याने राज्याच्या ब्रॅंडींगची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नुकतेच आम्ही राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असून विमानतळ विस्ताराला प्राधान्य दिले आहे. राज्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करणार असून त्यामाध्यमातून हवाईसेवा जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 ज्योतिरादित्य सिंधीया यांचे मराठीतून भाषण

यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. मुंबई आणि सॅनफ्रान्सिस्कोशी असलेल्या भावनिक नात्याची आठवण त्यांनी सांगितली. हवाईसेवेच्या क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचे सांगत जगात भारत हे नागरी हवाई उड्डाण क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाचा देश असून हवाईप्रवास सेवेला अधिक बळ देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.