आता अमित देशमुख घेणार आयुषच्या डॉक्टरांची मदत

आयुषच्या सर्व डॉक्टरांना एकत्र करुन, पहिले कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

123

देशभरासह राज्यात कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आज अॅलोपॅथीचा प्रामुख्याने उपयोग करण्यात येत आहे. पण येत्या काळात लातूर जिल्ह्यात आयुषच्या सर्व डॉक्टरांना एकत्र करुन, पहिले कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. आयुष टास्कफोर्सचे सदस्य यांच्यासोबत अमित देशमुख यांनी आज ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला.

काय म्हणाले अमित देशमुख?

वर्षभरापेक्षा अधिक काळ कोविड संकटाशी आपण सामना करत असून, अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. यामुळेच कोविड केअर सेंटरमध्ये आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीचा उपयोग रुग्णांसाठी करुन, एक पायलट सेंटर लातूरमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या काळात कोविड रुग्णांची संख्या तातडीने कमी करणे आवश्यक आहे. कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी मार्फत उपचार देता येऊ शकतात. त्यासाठी एस.ओ.पी. तयार करण्याचे काम आयुष संचालनालयामार्फत करण्यात यावे. जेणेकरुन राज्यात आयुष संचालनालयांतर्गत येणाऱ्या डॉक्टरांना कोविड रुग्णांवर उपचार करता येऊ शकतील. आयुर्वेद आणि उपचार पद्धतींचा उपयोग कोविड रुग्णांच्या उपचारासाठी होऊ शकतो. त्यामुळे ही एस.ओ.पी. वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आयुष संचालक यांनी तयार करावी, असे देशमुख म्हणाले.

(हेही वाचाः भाजपची आता कोरोनाबाधित रुग्णांसाठी  राज्यव्यापी डॉक्टर सहाय्यता हेल्पलाइन!)

दिल्ली, जयपूरचा पॅटर्न राज्यात राबवणार?

सध्या दिल्ली आणि जयपूरमध्ये कोविडसाठी आयुर्वेद उपचाराला मान्यता देण्यात आली असल्याने हाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येतील. यामुळे आयुष डॉक्टरांचे मोठे संख्याबळ उपलब्ध होणार आहे. आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथींना उपचारांसाठी परवानगी द्यावी, असे केंद्र शासनाकडे पत्र आयुष संचालनालयामार्फत देण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले. येणाऱ्या काळात लातूरमध्ये प्रामुख्याने इंटिग्रेटेड आयुष क्लिनिक सुरू करण्याबाबत विचार असून, याबाबतच्या अंमलबजावणीसाठी आयुष संचालनालयाने पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

आयुषच्या डॉक्टरांची होणार मदत

कोविडसाठी उपचार पद्धती निरनिराळ्या असून अॅलोपॅथी यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असली, तरी अल्टरनेटीव्ह थेरपी निरनिराळ्याअसू शकतात. आयुष संचालनालयांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी या क्षेत्रात काम आणि संशोधन केलेले आहे. त्यामुळे आपल्या  संशोधनाच्या कामाचा, ज्ञानाचा उपयोग या काळात करुन घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात होमिओपॅथिक, आयुर्वेदिक औषधे यांना मान्यता देताना त्यांनी मानके परिपूर्ण केली आहेत का, हे तपासून घेणे आवश्यक असल्याचे देखील ते म्हणाले.

(हेही वाचाः जयंत पाटील ‘इन अ‍ॅक्शन मोड’! सांगलीत कडक लॉकडाऊन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.