निराशा झटका, कामाला लागा! भाजपा नेते Amit Shah यांची सूचना

47
निराशा झटका, कामाला लागा! भाजपा नेते Amit Shah यांची सूचना
  • प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील अपयशाने आलेली निराशा झटका आणि कामाला लागा. प्रत्येक बूथवर किमान २० लोकांना भाजपाचे सदस्य करा. प्रत्येक बूथवर आपले १० कार्यकर्ते हवे आहेत. या कार्यकर्त्याना दसऱ्यापासून विधानसभा निवडणूक प्रचार संपेपर्यंत कामात व्यग्र ठेवा. आपल्या विचारांचे मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरवा. आपले मतदान १० टक्क्यांनी वाढल्यास विजय आपलाच आहे, अशा सूचना देत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी (१ ऑक्टोबर) भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत शाह यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचे स्वबळावर सरकार आणण्याचे लक्ष्य कार्यकर्त्यांना दिले.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने अमित शाह यांनी आपले लक्ष आता महाराष्ट्रावर केंद्रित केले आहे. भाजपाची निवडणूक रणनीती तसेच महायुतीतील जागावाटप यात अमित शाह (Amit Shah) यांची कळीची भूमिका आहे. गेल्या आठवड्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर अमित शाह हे मंगळवारी मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी दादरच्या योगी सभागृहात भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचा – Pollution : प्रदूषण जागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात शहाणपण देगा देवा मोहीम)

जे सरकार काम करत तेच सरकार पुन्हा निवडणुक जिंकते. त्यामुळे देशात आपण सलग तिसरे सरकार बनवू शकलो. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आपली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्वेक्षणाचा विचार करू नका. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा ठाम आत्मविश्वास शाह यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रात सत्ता आल्यास देशात समान नागरी कायदा आणण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असेही शाह (Amit Shah) म्हणाले.

महाराष्ट्राची निवडणूक ही देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढवा. मतदान वाढले तर विजय महायुतीचाच होईल. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही. आपल्याविरुद्ध आपल्या नगरसेवक, आमदार आणि खासदारांच्या विरोधात जनतेत असलेली नाराजी दूर करा. प्रत्येक निवडणूक बूथवर आपल्याला १० कार्यकर्ते पाहिजेत. दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत हे कार्यकर्ते त्यांच्या बूथच्या कक्षेत फिरत राहतील. या कार्यकर्त्यांनी आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवावे. प्रत्येक बूथवर किमान २० लोकांना भाजपाचे सदस्य करा. सदस्य करताना मत मागू नका. सदस्य झाल्यावर त्यांना आपसूक मतदानाचे महत्त्व कळेल, असे शाह (Amit Shah) म्हणाले.

(हेही वाचा – Road Cement Concreting : आयआयटी आणि महापालिकेच्या अभियंत्यांमध्ये सुसंवाद ठेवा, महापालिका आयुक्तांचे निर्देश)

भाजपा हा पक्ष राज्य करण्यासाठी सत्तेत नाही तर विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेत आहे. राम मंदिर, जम्मू काश्मीरमधून कलाम ३७० हटविणे हे काम करण्यासाठी भाजपा सत्तेत आली. भाजपाचे सरकार आल्यानंतर गेल्या १० वर्षात दहशतवाद आणि नक्षलवाद गाडला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वामुळे जगात भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे, असेही शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक निकालाचे विश्लेषण केले. राज्यातील लोकसभेच्या सहा जागा अशा आहेत, जिथे एका लोकसभेच्या पाच विधानसभा मतदारसंघात आपल्याला बहुमत आहे. पण एका ठिकाणी विरोधक बहुमत घेऊन जिंकले. याचा अर्थ सहापैकी पाच विधानसभा आपण जिंकू तर ते एकच जिंकतील, असेही अमित शाह (Amit Shah) म्हणाले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.