राणेंच्या वादात अमित शहांची एन्ट्री : सेनेच्या अडचणीत वाढ

सेनेने जसा राणेंच्या अटकेचा विषय हा प्रतिष्ठेचा बनवला, तसा आता महाराष्ट्र भाजपनेही हा विषय प्रतिष्ठेचा बनवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी राणे यांना भाजपने पाठिंबा दिला आहे.

79

शिवसेनेने येनकेन प्रकारेण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा मनसुबा आखला आणि तशी अटकही करून दाखवली. यामुळे मागील ३ दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद दोन दिवसांनंतर दिल्लीत उमटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणेंना फोन करून त्यांना केलेल्या अटकेच्या कारवाईविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली असल्याची माहिती समजते. त्यामुळे शिवसेनेमध्ये आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनेच्या नेतृत्वाने शिवसेना नेते संजय राऊत यांना भुवनेश्वरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतण्याचा आदेश दिला आहे.

केंद्रीय मंत्री राणे याचे अटक नाट्य रंगात असताना दिल्लीतून विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया येत नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते. अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणेंची करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईची सविस्तर माहिती घेतली. त्यामुळे आता राज्यात शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शिवसेना – भाजप हा वाद महाराष्ट्रात चांगलाच रंगला आहे. सेनेने जसा राणेंच्या अटकेचा विषय हा प्रतिष्ठेचा बनवला, तसा आता महाराष्ट्र भाजपनेही हा विषय प्रतिष्ठेचा बनवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी राणे यांना भाजपने पाठिंबा दिला आहे.

(हेही वाचा : कमरेचे सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याची विकृती थांबवा!)

अनिल परब अडचणीत येणार!

दरम्यान भाजपने परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुरुवातीला लक्ष्य बनवले आहे. ज्या वेळी राणे यांना अटक होणार होती, तेव्हा अनिल परब यांचे पोलिस अधिकाऱ्यांशी झालेले संभाषण समोर आले. त्यामध्ये परब हे राणेंना अटक करण्याचे आदेश देताना आढळून आले आहे. त्यामुळे भाजपने याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे परबांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच बरोबर दैनिक सामान मधून नारायण राणे यांच्यावर हीन पातळीवर टीका केल्याने संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांच्या विरोधात नाशिकमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. याचाही भाजप पाठपुरावा घेईल, अशी शक्यता आहे. दरम्यान या सर्व घडामोडी लक्षात घेऊन शिवसेनेच्या नेतृत्वाने शिवसेना नेते संजय राऊत यांना तातडीनं मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईला यायला निघाले आहेत.

यात्रा सुरूच राहणार!

नारायण राणे यांनी त्यांची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गातून शुक्रवार, २७ ऑगस्टपासून सुरु होणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश दिला आहे. मात्र तरीही ही यात्रा काढणारच, असा निर्णय भाजपने घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.