शिंदे-फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर अमित शहांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच विस्तार कधी करावा, मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश करावा, याचे सर्वाधिकार त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना दिल्याचे कळते.
नव्या दमाच्या आमदारांना संधी देणार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नी दोन्ही राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतंत्रपणे शिंदे-फडणवीसांसोबत बैठक घेतली. त्यात रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा झाली. ही बैठक जवळपास अर्धा तास चालली. आमदारांची नाराजी, त्यामुळे विस्तार करण्यातील अडचणी, यांसह अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. नव्या दमाच्या आमदारांना संधी द्या, सातत्याने माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करणाऱ्यांचा पत्ता कट करा, अशा सक्त सूचना यावेळी शहा यांनी केल्याचे समजते. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करायचा, की त्यानंतर यावरही प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःकडील अतिरिक्त खाती अन्य सहकाऱ्यांकडे दिल्याने हिवाळी अधिवेशनानंतरच विस्तार करण्याबाबत या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेही आपल्याकडील अतिरिक्त खात्यांचा कारभार अन्य मंत्र्यांकडे देऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षात म्हणजे जानेवारीच्या अखेरीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.
(हेही वाचा आता FIFA Jihad : मुस्लिम देश मोरोक्काची फुटबॉल टीम हरल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून दंगल )
मंत्र्यांकडे अतिरिक्त खाती
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडील खात्यांची जबाबदारी मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांकडे दिली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्याकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे जलसंधारण विभाग, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खाते, रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे मदत व पुनर्वसन खाते, तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभागाचा कारभार देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community