भाजपच्या पाटलांपेक्षा ‘हे’ पाटील शहांच्या जवळचे?

अमित शहा यांना चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा बाहेरुन आलेले हे दोन पाटील महत्त्वाचे वाटतात का?

128

राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे दिल्लीत जाऊनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट होऊ न शकल्याची. कुणी म्हणतंय अमित शहा चंद्रकांत दादांवर नाराज आहेत, तर कुणी म्हणतंय चंद्रकांत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आहे. पण एकीकडे चंद्रकांत पाटील यांना जर अमित शहा यांनी भेटीची वेळ दिली नसली, तरी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या दोन पाटलांना मात्र अमित शहा यांनी वेळ दिली आहे. त्यामुळे अमित शहा यांना चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा बाहेरुन आलेले हे दोन पाटील महत्त्वाचे वाटतात का? असा सवाल मात्र आता उपस्थित होऊ लागला आहे.

कोणतेही पद नाही तरीही शहांची भेट

दोन विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील भाजपच्या कोणत्याही पदावर नाहीत, तर चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र तरी देखील या दोन्ही पाटलांनी अमित शहांची भेट घेण्यात यश मिळवले आहे. राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्रात मंत्रीपद भूषवले आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्याचे सहकार मंत्री देखील होते. त्यामुळे त्यांचा राज्यातील सहकाराबाबतचा चांगला अभ्यास आहे. त्यातच अमित शहा हे देशातील पहिले सहकार मंत्री झाले असून, ते सध्या सर्व राज्यांतील सहकाराबाबत जाणून घेत आहेत. याचमुळे अमित शहा यांनी सहकाराबाबत दांडगा अनुभव असलेल्या या दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट घेतल्याचे कळते.

(हेही वाचाः उत्तर भारतीयांमुळे होणार मनसेचा घात?)

दादांनी दिले स्पष्टीकरण

चंद्रकांत दादांनी अमित शहा यांच्यासोबत का भेट झाली नाही? यावरही सविस्तर विवेचन केलं आहे. अमित शहा आणि मोदींची भेट झाली नाही, कारण त्यांच्याकडे आमचं काही काम नव्हतं. त्यांनाही आम्ही पत्रं दिलं होतं. 15 दिवस आधी या दौऱ्याची तयारी होती, अचानक दौरा झाला नाही. आधी केवळ नड्डा आणि काही नेत्यांची भेट घेण्याचं ठरलं, शहा आणि मोदींच्या भेटीचं ठरलं नव्हतं. लोकसभा आणि राज्यसभा चालत नाही, त्यामुळे त्यांना टेन्शन असतं. आम्ही जाऊन फक्त नमस्कारच करणार होतो, त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा वेळ घेणं योग्य वाटलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

उलटी दिशा देणं योग्य नाही

पण इकडे बातम्या सुरू झाल्या, शहांनी माझी भेट नाकारली. शहा फडणवीसांना भेटले, पण मला भेटले नाहीत वगैरे वगैरे. देवेंद्र फडणवीस आठ-दहा दिवसांनी दिल्लीत जातात. आमच्याकडे विषय नव्हते, फडणवीस आणि शहांची भेट सुद्धा लोकसभेत झाली. इतकं शहांचं शेड्यूल टाईट होतं. त्यामुळे या दौऱ्याला उलटी दिशा देणं योग्य नाही. फडणवीसांना भेट दिली आणि मला नाकारली असं म्हणणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

(हेही वाचाः अस्लम शेख यांच्या खात्यात सामंतांची वाझेगिरी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.