2014 साली हिंदूत्ववादी शिवसेनेला कोणी दूर केले? संजय राऊतांचा अमित शहांवर पलटवार

116

सत्तेसाठी शिवसेनेने हिंदूत्व सोडले असा आरोप भाजप नेते, गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात केला. त्यावर प्रत्युउत्तर देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सत्तेसाठी 2014 साली प्रखर हिंदुत्ववादी शिवसेनेला दूर करा हे सांगणारे कोण होते, सत्तेसाठी शिवसेनेसोबत युती तोडणारे कोण होते, हे अमित शहा यांनी स्पष्ट करावे’, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्याच्या दौ-यावर असताना शिवसेनेला खुले आव्हान दिले की, हिंमत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करा. आता यावर संजय राऊत यांनी पलटवार केला. राज्यात भाजपाने सत्ता गमावल्यानं वैफल्यग्रस्त झाल्यामुळे अमित शहांनी हे वक्तव्य केल्याचं राऊत म्हणाले. तसेच शहांचं वक्तव्य असत्याला धरुन आहे. आम्हाला अमित शाह पुण्यात जे बोलले, त्यावर आम्हाला दया आली आणि आश्चर्यही वाटलं, असं राऊत यांनी म्हटले.

पुण्यात खोटे बोलू नये

आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदूत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप नेत्यांकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. भाजपचे केंद्रीय नेतेदेखील वैफल्यातून असे वक्तव्य करत  असल्याचे राऊत यांनी म्हटले. सत्ता वाटपाबाबत शिवसेना खोटं बोलत असल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शाह यांच्या उपस्थितीत 50-50 टक्के सत्ता वाटप ठरले होते. पुणे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे पुण्यात तरी शाह यांनी खोटं बोलू नये, असे राऊत यांनी म्हटले.

( हेही वाचा: व्हॉट्सअ‍ॅप वरील हे नवं शानदार फिचर तुम्हाला माहिती आहे का? )

शिवसेनेला रोखण्यात अपयश

सत्तेसाठी हिंदूत्व सोडले असल्याचे शाह यांनी म्हटले होते. संजय राऊत यांनी त्यावरही प्रतिउत्तर दिले आहे. सत्तेसाठी 2014 साली प्रखर हिंदुत्ववादी शिवसेनेला दूर करा हे सांगणारे कोण होते, सत्तेसाठी शिवसेनेसोबत युती तोडणारे कोण होते, हे अमित शहा यांनी स्पष्ट करावे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय सत्तेने तयार केलेली कृत्रिम लाटदेखील शिवसेनेला रोखू शकली नसल्याचे राऊत यांनी म्हटले.

समोरून वार करा

भाजपने सीबीआय, ईडी आणि एनसीबी ही आपली तीन चिलखतं काढावीत आणि लढावे असे प्रतिआव्हान संजय राऊत यांनी दिले. आम्ही समोरून लढतो, छातीत वार करतो, पाठीत वार करणारे आम्ही नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे भाजपने आपली चिलखतं काढावीत, मग वार करावेत असे आव्हान त्यांनी दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.