भाजपा नेते अमित शहा यांनी २०१९च्या निवडणुकीआधी मातोश्रीत येऊन बाळासाहेबांचा खोलीत ‘अडीच वर्षे मुख्यमंत्री पद शिवसेनेला देऊ’ असा शब्द दिला होता, पण नंतर शब्द फिरवला, असा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडून दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. मात्र अडीच वर्षे ठाकरे हेच कारण देत भाजपाला दूषणे देत आहेत. परंतू यावर कालपर्यंत कधीच भाष्य न केलेले अमित शहा यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘त्या’ खोलीत काय चर्चा झाली, याचा तपशील सांगितला आहे.
उद्धव ठाकरेंना शब्द दिलाच नव्हता
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शहा यांनी सांगितलेला तपशील सांगितला. निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत काय बोलणी झाली होती, ती मला माहित नव्हती. पण, आता माझ्या भाजपच्या नेत्यांसोबत गाठीभेटी झाल्या, त्यात मला तेव्हाची बरीच माहिती मिळाली. अमित शहांनी मला सांगितले की, आमची कमिटमेंट फायनल असते. आम्ही तिकडे बिहारमध्ये कमी जागा आलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. तर, शिवसेनेचा मुख्यमंत्री करायला अडचण नव्हती. आम्ही उद्धव ठाकरेंना शब्द दिला असता, तर तो पाळला असता. पण, आमचे तसे काहीच बोलणे झाले नव्हते, असे शहा यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
(हेही वाचा सकाळी ७.३० ते दुपारी ३.३०; काय घडले संजय राऊतांच्या बंगल्यात?)
उद्धव ठाकरेंनी ऐकले नाही
शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडून आलो होतो. मी तेव्हा उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो की, देवेंद्र फडणवीस आणि आपण समोर बसून चर्चा करू. प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो, फक्त तो शोधण्याची इच्छाशक्ती असावी लागते. पण, तसे झाले नाही. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली. तेव्हा आम्ही सगळे म्हणालो होतो, ही अशी आघाडी करू नका. पण, पक्षाचा आदेश ऐकायचा असतो, बाळासाहेबांची शिकवण आहे. नंतर आघाडी सरकार स्थापन झाले अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
Join Our WhatsApp Community