मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली. मात्र आता हा ‘राज’पुत्र थेट जनतेसाठी कोविड काळात देखील मैदानात उतरला आहे. अमित ठाकरे यांनी आज मुंबई, ठाणे परिसरातील विविध कोविड मदत कक्षांची पाहणी केली. गेल्यावर्षी देखील अमित ठाकरे यांनी कोरोना काळात विविध विषयांवर कधी आरोग्य मंत्री, तर कधी आपले काका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित अनेक मुद्दे समोर आणले होते.
अमित ठाकरे यांचे दिवसभरात इतके दौरै
बुधवारी सकाळी ११.३० पासून अमित ठाकरे यांनी आपल्या पहाणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी ठाणे येथे कोविड मदत कक्षास भेट देत ५०० कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप केले. १२.०० वाजता मुलुंड येथे कोविड मदत कक्षास व त्यानंतर भांडूप येथील कोविड मदत कक्षास अमित ठाकरे यांनी भेट दिली.
एप्रिल महिन्यात अमित ठाकरेंना कोरोना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसेचे नेते अमित ठाकरे एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातू बरे झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी आपण घरी परतलो असून, प्रकृती उत्तम असल्याचे ट्वीट करत माहिती दिली होती. शुभेच्छांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते, याचा अनुभव मी नुकताच घेतला आहे, असे अमित ठाकरे म्हणाले होते.
(हेही वाचाः अमित ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज!)
काही महिन्यांपूर्वी मनसेने मांडले अमित ठाकरेंचे रिपोर्ट कार्ड
काही महिन्यांपूर्वी मनसेने अमित ठाकरे यांचे वर्षभराचे रिपोर्ट कार्ड मांडले होते. नेमके काय होते ते रिपोर्ट कार्ड, त्यावर नजर टाकूया.
- आरे कॉलनी म्हणजे मुंबईचा श्वास, मुंबईचा श्वास तोडण्याचे प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून केले जात होते. पर्यावरणाचा विचार करुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी ह्या आंदोलनात स्वतः सहभाग घेत, अनेक संघटनांच्या सहाय्याने हा मुद्दा निकालात काढला.
- राज्यातील बंधपत्रित डाॅक्टर्स आणि नर्सेस यांच्या पगारातील कपात रद्द करण्याची मागणी मनसेच्या वतीने अमित ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आली.(८ जुलै २०२०)
- कोरोना संकटकाळात इंग्रजी माध्यमाच्या- आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून घ्यायला हव्यात. राज्याच्या मुख्यमंत्र्याना पत्र लिहून “पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये. तसेच फी भरण्यासाठी पालकांवर कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये, यासंदर्भात आपण स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा” अशी मागणी मनसेच्या वतीने अमित ठाकरे ह्यांनी केली.
(हेही वाचाः ‘राज’पुत्राची मनसे वर्षपूर्ती!)
- आपल्या महाराष्ट्राची ‘राजभाषा’ मराठी आहे, प्रशासनची पत्रके हिंदी/इंग्रजी भाषेत येत होती. शासन आदेश मातृभाषेतून लोकांना कळावेत म्हणून मुख्य सचिवांना मनसेच्या वतीने मनसे नेते अमित ठाकरे ह्यांनी पत्र लिहिले.
- महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविकांना खूपच कमी मोबदला दिला जात होता. त्यांना मिळणारा मोबदला वाढायला हवा ह्या मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह भेट घेतली. अजित पवार यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची ही मागणी मान्य करत आशा स्वयंसेवकांच्या वेतनात दुप्पट वाढ केली.
- कोरोना काळात बेड उपलब्धता असल्याचे नागरिकांना कळावे ह्यासाठी “App” विकसित करुन कोरोना विषयक माहिती त्यावर प्रकाशित करावी. प्रत्येक रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, पोलिस कर्मचाऱ्यांना राखीव बेड असावेत अशा मागणीसाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.
- कोविड संकटकाळात विविध रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर्स महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्यावरची पदव्युत्तर परीक्षेची (डिप्लोमा आणि डिग्री) टांगती तलवार मानसिक तणाव निर्माण करणारी होती. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी सरकारला पत्र लिहिलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हाच विषय पंतप्रधानांकडे मांडला. अमितजींमुळे निवासी डॉक्टरांच्या समस्यांना वाचा फुटली.
- एमपीएससी-युपीएससी परीक्षांची पूर्वतयारी करणारे शेकडो विद्यार्थी अनेक ठिकाणी, विशेषतः पुण्यात अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जाता यावं, यासाठी एसटी उपलब्ध करुन देण्याची विनंती अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोनद्वारे केली. मनसेचे कार्यकर्ते यांनी आरक्षित केलेल्या बसेस तसंच एसटी बसेस यांच्यामुळे हे शेकडो विद्यार्थी घरी सुखरुप पोहोचले.
- कोविडचा संसर्ग सुरु झाल्यावर टाळेबंदीच्या पहिल्या- दुस-या आठवड्यातच डॉक्टरांना पीपीई किट आणि मास्क उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्यांची दखल घेऊन अमित ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेला शेकडो पीपीई किट, मास्क उपलब्ध करुन दिले.