आदित्यच्या पावलांवर अमितचे पाऊल!

104

मुंबईतील चौपाटी स्वच्छ राखण्याच्या प्रयत्न करणाऱ्या अफरोज शाह यांच्या बरोबरीने हाती राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्लास्टिक हातमोजे चढवत स्वच्छता मोहिमेत सहभागी होणाऱ्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे अनुकरण आता त्यांचे छोटे चुलत बंधू अमित राज ठाकरे यांच्याकडून होत आहे. आदित्य ठाकरे यांनी केवळ मुंबईतील चौपाटीवर स्वच्छता राखण्याच्या मोहिमेत सहभाग नोंदवला होता. परंतु अमित ठाकरे यांनी मुंबईसह राज्यातील प्रमुख चौपट्या स्वच्छ राखण्याची मोहीम एकाच वेळी राबवली.

४० समुद्र किनाऱ्यांवर हजारो नागरिकांचा सक्रिय सहभाग 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे’ला आज सगळीकडे भरभरून प्रतिसाद लाभला. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील ४० समुद्र किनाऱ्यांवर हजारो नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत ‘आपले’ समुद्र किनारे प्लॅस्टिकमुक्त तसंच कचरामुक्त केले. हा एक आगळावेगळा विक्रमच असल्याचंही म्हटलं जातंय.

शर्मिला राज ठाकरेही सहभागी

“परदेशातील समुद्र किनारे स्वच्छ, चकाचक असू शकतात, मग आपले समुद्रकिनारे गलिच्छ, बकाल का असतात?” असा सवाल उपस्थित करून मनसे नेते अमित ठाकरे यांनी ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे’त सहभागी होण्याचं आवाहन सर्वाना केले होते. शनिवारी सकाळी ११ वाजता ते स्वतः दादर समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. ‘सावित्री प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा शर्मिला राज ठाकरे यांनीही समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, दादर समुद्र किनाऱ्यावर चार हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यांमध्ये अपंग बांधवांचाही समावेश होता.

नागरिकांना आवाहन

“गेली २५ वर्षं जे सत्तेत आहेत, ते साधे समुद्र किनारे स्वच्छ करू शकले नाहीत. दुर्दैवाने, असं काही करण्याची इच्छाशक्तीच त्यांच्याकडे नाही. म्हणूनच माझे आता लोकांनाच आवाहन आहे की, आपले समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपणच आपल्या हातात घेऊया, असं मत अमित ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

लोक सहभागातून करणार कामे

“महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही मोहीम म्हणजे फक्त एका दिवसाचा उपक्रम नाही. आपल्या राज्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी आम्ही लोकसहभागातून पुढची अनेक वर्षं काम करणार आहोत, असंही अमित ठाकरे यांनी सांगितलं.

चौपट्या स्वच्छतेवर समित्यांचे लक्ष

ज्या ४० समुद्र किना-यांवर आम्ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत, तिथे स्थानिक नागरिकांशी संवाद साधून ‘समुद्र किनारा समिती’ स्थापन करण्यात आली आहे. आम्ही स्थापन केलेल्या ४० ‘समुद्र किनारा समित्या’ असून प्रत्येक समितीत २५ सदस्य आहेत. या समित्याच यापुढे समुद्र किना-यांशी संबंधित आपले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी दिली.

स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेल्या समुद्र किनाऱ्यांची नावे

गिरगाव, प्रभादेवी-दादर, माहिम, वांद्रे, वर्सोवा, जुहू, आक्सा, दानापानी, उत्तन, वेलंकनी, डहाणू, नांदगाव, केळवा, अर्नाळा, कळंब, नायगाव- सुरुची, चिंचणी, शिरगाव, नागाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, मुरुड, किहिम, अलिबाग, उरण, आवास, सासवणे, मुरुड- हर्णे, आंजर्ले, गणपतीपुळे, मांडवी, गुहागर, सागरेश्वर- वेंगुर्ला, शिरोडा, कुणकेश्वर.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.