राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी हे सांगलीत एका सभेत बोलत होते, त्यांच्यामागे व्यासपीठावरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे गादीवर बसले होते. त्यावेळी मिटकरी यांनी थेट हिंदू धर्मातील कन्यादान या विवाहातील एका धार्मिक विधीची टिंगल केली. त्यातील मंत्राचा आक्षेपार्ह अर्थ काढला. त्यावेळी मागे बसलेले जयंत पाटील, मुंडे पोट धरून हसत होते. मात्र दुसऱ्या दिवसापासून जेव्हा पुण्यात ब्राह्मण महासंघ, नाशकात ब्राह्मण समाज, भाजपाची अध्यात्मिक आघाडी हे सगळे रस्त्यावर उतरले, तेव्हा मात्र जयंत पाटील यांनी हात झटकले, तर राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी मिटकरी यांना एकटे सोडून दिले.
जयंत पाटलांची गोची, सुप्रिया सुळेंचे मौन
या प्रकरणी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, जेव्हा मिटकरी कन्यादान विधिविषयी बोलत होते, तेव्हा मला ते आक्षेपार्ह वाटले, मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मिटकरी यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक आहे, पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही, असे पाटील म्हणाले. प्रत्यक्षात मात्र जयंत पाटील हे पोट धरून हसताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना जेव्हा माध्यमांनी विचारणा करत मिटकरी यांच्या निषेध करणार का, अशी विचारणा केली, तेव्हा सुप्रिया सुळे याही अडचणीत आल्या, त्यांनी याविषयी भाष्य करणे टाळत, आपण मिटकरी यांचे भाषण ऐकले नाही, असे सांगत वेळ मारून घेतली.
(हेही वाचा ‘त्या’ १८ मंत्र्यांचा सरकारी रुग्णालयांवर भरवसा नव्हता का?)
राष्ट्रवादी हिंदू धर्मविरोधी
आधीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीयवादी नेते म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला, त्याविषयी खुलासे करता करता राष्ट्रवादीच्या नाकीनऊ आले आहे. असे असताना आता मिटकरी यांचे वक्तव्य हे थेट हिंदू धर्म आणि धर्मातील धार्मिक संस्कारावर टीका करणारी आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीची शिकवणच हिंदू धर्म आणि ब्राह्मण यांच्याविरोधात आहे का, असा संदेश गेला आहे. त्यामुळे आता मिटकरी यांच्यावर खुलासे करताना राष्ट्रवादीच्या नाकात दम आला आहे.
मिटकरी मात्र ठाम
दुसरीकडे मात्र मिटकरी यांनी हिंदू धर्मियांच्या भावनांचा विचार न करता आपण अजिबात माफी मागणार नाही असे सांगत थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाच टार्गेट केले आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊंची जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.