स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : भाजपाला गरजेपुरते आठवतात का वीर सावरकर?

राष्ट्रप्रेमी हिंदूंनी एकमताने मोदी सरकारला दुसऱ्यांदा बहुमताने दिल्लीच्या तख्तावर बसवले, मात्र तरीही पंतप्रधान मोदी काँग्रेसप्रमाणेच वीर सावरकर यांचा सन्मान करण्याविषयी दुजाभाव करत आहेत.

106

भारताला स्वातंत्र्य हे शेकडो-हजारो ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने मिळाले नाही, तर अहिंसेच्या मार्गाने मिळाले आहे, हा विचार काँग्रेसने मागील ७० वर्षे देशावर बिंबवला. म्हणूनच काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या रांगेतून सशस्त्र स्वातंत्र्य चळवळीचे महामेरू वीर सावरकर यांना कायम डावलले. काँग्रेसची ही बुद्धीभेद करणारी गोबेल्स नीती नरेंद्र मोदी सरकारच्या कालखंडात नष्ट होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ही आशा फोल ठरली आहे. देशातील कोट्यवधी राष्ट्रप्रेमी हिंदूंनी एकमताने मोदी सरकारला दुसऱ्यांदा बहुमताने दिल्लीच्या तख्तावर बसवले, मात्र तरीही पंतप्रधान मोदी काँग्रेसप्रमाणेच वीर सावरकर यांचा सन्मान करण्याविषयी दुजाभाव करत आहेत. कारण तसा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भारतीय जनता पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कधीही पूर्णपणे स्वीकारलेले नाही. केवळ आपण हिंदुत्ववादी आहोत, हे दाखवण्यासाठी वीर सावरकरांच्या प्रतिमेचा आणि प्रतिभेचा उपयोग केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या हाती केंद्रात सत्ता आहे, तीही बहुमताच्या आधारे आहे, असे असूनही आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न प्रदान केले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. त्याचेच प्रतिबिंब या बॅनरमध्ये उमटले आहे.
मनीषा कायंदे, प्रवक्ता, शिवसेना

केंद्राच्या बॅनरवर वीर सावरकर नाहीत!

भारत सरकार सध्या देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने देशभरात ठिकठिकाणी वर्षभर कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक बॅनर ठरवला, तोच बॅनर सध्या सर्व कार्यक्रमात दिसत आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीत सहभागी प्रमुख नेत्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. त्यामध्ये एका बाजूला सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू (ज्यांनी त्यांचा सख्खा भाऊ वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय क्रांतिकारक असल्यामुळे त्यांच्याशी संबंध तोडले होते.), लोकमान्य टिळक आणि डॉ. राजेंद्र प्रसाद आहेत, तर दुसरीकडे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू या सर्वांचे फोटो आहेत. आजवर या सर्वांच्या ओळीत नेताजींचा उल्लेख कधीच नसायचा, तो या बॅनरमध्ये दिसला, ही जमेची बाजू असली तरी वीर सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक पातळीवर आणून ठेवले, याची देही याची डोळा ब्रिटिशांना स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले, असे वीर सावरकर मात्र या बॅनरवर दिसत नाहीत. हे पाहून केंद्र सरकार भाजपचे आहे कि काँग्रेसचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पंतप्रधान मोदी अंदमानात जातात, वीर सावरकर यांच्या कोठडीत नतमस्तक होतात. पण स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी जर त्यांना वीर सावरकर आठवत नसतील, तर मग वीर सावरकर हे केवळ राजकारण करण्यापुरतेच आहेत का, असा प्रश्न पडतो. ज्या घराण्यातील तीन भावंडांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले, शिक्षाही भोगल्या त्याच घराण्याला स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी विसर पडायला नको होता.
डॉ. सच्चिदानंद शेवडे, सावरकर साहित्याचे अभ्यासक, राष्ट्रीय प्रवचनकार.

गरजेपुरते आठवतात का वीर सावरकर?

वीर सावरकर हे एकमेव नेते होते ज्यांनी निखळ राष्ट्रवाद आणि हिंदुत्व मांडले. हा विचार नुसता मांडलाच नाही, तर स्वातंत्र्य चळवळीला याच विचारांच्या जोरावर यशस्वी करून दाखवले. त्यासाठी या विचारांची लाखो तरुणांची फौज तयार केली. ज्या काळात गांधींच्या अहिंसा विचारांचा देशात बोलबाला होता, त्या काळात वीर सावरकरांनी ‘हे स्वातंत्र्य हजारो सशस्त्र क्रांतिकारकांचा रक्ताचे फलित आहे’, हा विचार कायम तेवत ठेवला. म्हणूनच आज हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष जनतेला स्वतःच्या हिंदुत्वाची खात्री पटवून देण्यासाठी वीर सावरकरांचा उल्लेख आवर्जून करतात, परंतु दुर्दैवाने तो गरजेपुरता असतो का, असे खेदाने विचारावेसे वाटते. तसे नसते तर मोदी सरकारच्या काळातच वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला असता. पण तसे मागील सात वर्षांत घडले नाही. म्हणूनच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करताना मोदी सरकारने बॅनरवर स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांमध्ये वीर सावरकर यांचा फोटो घेतला नाही, त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सातत्याने अन्याय होत आलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इतरांच्या तुलनेत मोलाचे योगदान देऊन ही हयात असतांना १९४७ साली तत्कालीन राज्यकर्त्यांनी हेतुपुरस्सर त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही, तेव्हापासून वीर सावरकरांची होत असलेली शासकीय अवहेलना आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊन गेल्यावरही चालूच आहे, हे भारताचे दुर्दैव म्हणायला हवे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाच्या केवळ फ्लेक्सवरच नव्हे, तर वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांत वीर सावरकरांना मानाचे स्थान देऊन त्यांचा गौरव करायला हवा. तसेच या वर्षी भारतमातेच्या सुपुत्राप्रती कृतज्ञता म्हणून वीर सावरकरांना ‘भारतरत्न पुरस्कार’ जाहीर करावा.
रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

(हेही वाचा : ‘द वीक’ची शरणागती! म्हणाले, वीर सावरकर ‘सर्वश्रेष्ठ’!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.