“मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारा परब गजाआड जाणार”, रवी राणांचे टीकास्त्र

152

गुरूवारी सकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह इतर ठिकाणी ईडीकडून छापा टाकण्यात आला. यावरूनच आमदार रवी राणा यांनी अनिल परबांवर चांगलांच हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांच्यावर टीका करताना राणांनी कठोर शब्दांत निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रवी राणा…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा मंत्री मातोश्रीचा खजिनदार आहे. वाझेच्या माध्यमातून पैसे जमा करून अनिल परब मातोश्रीवर पोहोचवत होते. त्याचा आता भांडाफोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळी केली नाही, त्यांची दिवाळी परबांमुळे अंधारात गेली. नवनीत राणा यांच्या सारख्या एका महिला खासदाराला परबांनी जेलमध्ये टाकलं. मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाणारा अनिल परब गजाआड जाणार असे राणांनी म्हटले तर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे कारनामे लवकरच बाहेर निघतील, असा इशाराही रवी राणा यांनी यावेळी दिला.

(हेही वाचा – “शिवसेना संपवण्यासाठीच राष्ट्रवादीचा जन्म”, सुजय विखे-पाटलांचा हल्लाबोल)

यापूर्वीही ईडीच्या हिटलिस्टमध्ये परब

ईडीने परब यांच्या पुणे आणि मुंबईतील 7 ठिकाणांवर सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास छापे टाकले आहेत. परब यांच्यावर कोट्यवधींची लाच घेतल्याचा आरोप असून, त्यामुळे ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला आहे. ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे.

परब यांनी जमीन खरेदीसाठी 1 कोटींची लाच घेतल्याच्या आरोपावरून ईडीने ही कारवाई केली आहे. 2019 मध्ये परब यांच्यावर गुन्हाही दाखल आहे. 2020 मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना 1.10 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप आहे. तसेच अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणातही अनिल परब यांचेही नाव पुढे आले होते. अटक करण्यात आलेले मुंबई माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी परब यांच्यावर अनेक आरोप केले होते. मंत्रीपदावर असताना कोटय़वधींची लाच घेतल्याचा परब यांच्यावर सर्वात मोठा आरोप होता. बदली-बढतीसाठी लाच घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.