‘हनुमान चालीसा’ वादानंतर न्यायालयीन कोठडीतून सुटल्यावर प्रकृती खालावल्याने खासदार नवनीत राणा लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तेव्हापासून राणा यांचे रुग्णालयातील अनेक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. इतकेच नाही तर वैद्यकीय तपासणी सुरू असताना राणांच्या फेसबुकवरून त्याचे थेट प्रक्षेपण केले जात होते. रविवारी त्यांचा एमआरआय मशीनमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोवर आक्षेप घेत आता शिवसेना आक्रमक झाल्याचे माध्यमातून पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयात दाखल होत रुग्णालय प्रशासनाला जाब विचारले.
शिवसेना आक्रमक, रुग्णालय प्रशासनाला विचारला जाब
राणांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे या लिलावती रुग्णालयात पोहोचल्या. शनिवारी नवनीत राणांचा रुग्णालयातला फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आक्रमक रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा स्पाँडिलायसिसचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांचा एमआरआय काढण्यात आला. यावेळी एमआरआय काढतानाचे त्यांचे काही फोटो व्हायरल झाले होते. यावरूनच पेडणेकर यांनी आक्षेप घेतला आहे.
(हेही वाचा – राणा दाम्पत्य दिल्लीकडे रवाना, भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी होणार?)
सीसीटीव्ही फुटेजचा मला द्या, पेडणेकरांनी मागणी
नवनीत राणांचा एमआरआय नक्की झाला की नाही? झाला असेल तर रुग्णालय प्रशासनाने त्याचा रिपोर्ट सादर करावा. एमआरआय रुममध्ये रुग्णासोबत एकाच व्यक्तीला परवानगी असताना राणांसोबत चार लोक कसे गेले. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ मला द्या, अशी मागणीही पेडणेकर यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, एमआरआय कक्षात धातू, चुंबक, दागिने, काचेची वस्तू बाहेर काढून ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात, तसेच प्रवेशद्वारावर नमूद केलेले असते; मात्र नवनीत राणांना हे नियम लागू होत नाहीत का, असा सवाल सध्या सोशल मिडियावर नेटिझन्सकडून उपस्थित केला जात आहे.