…तर बाळासाहेबांनी अशा लोकांना जमिनीत गाडले असते, राणांचा मुख्यमंत्र्यावर संताप

137

शनिवारी शिवसेनेची मुंबईत आयोजित सभा म्हणजे लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती, अशा शब्दात आमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि लोडशेडिंगबद्दल एक शब्दही उच्चारला नाही, फक्त दुसऱ्यांवर बोलण्यासाठी ती सभा होती, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. अकबरूद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला. त्यांवरही बोलताना त्या म्हणाल्या, औरंगजेबाच्या कबरीवर फुलं अर्पण कऱणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री काहीच बोलले नाही. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अशा लोकांना जमिनीत गाडले असते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असे आज त्या दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

(हेही वाचा – पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं, केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी)

लाचार मुख्यमंत्री मिळणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव

यावेळी औरंगाबादच्या नामकरणावरूनही नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला त्या म्हणाल्या, औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले तर नाही. पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायचे त्यांनी सांगितले होते. पण व्यासपीठावर बोलताना नामांतरणाची काही गरज नाही, असा सवाल उपस्थित केला. आपण औरंगाबादचे नाव बदलायला गेलो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपली साथ सोडतील आणि आपली सत्ता जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून दाखवले. पण मुख्यमंत्री एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत. इतके लाचार मुख्यमंत्री मिळणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव. त्यांना माहित आहे की नाव बदललं तर बाकीचे पक्ष बाजूला होतील, अशी खोचक टीका नवनीत राणा यांनी केली.

ही तुमची नवी विचारधारा? राणांचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या सभेत कोणताही उत्साह दिसत नव्हता. ही सभा मुंबई महापालिकेसाठी होती आणि सगळ्या राज्यातून लोक तिथे आले. मात्र मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढायला हवी, याचे उत्तर त्यांनी का दिले नाही? बाळासाहेब कधी लढले नाहीत, सत्तेवर बसले नाही, कायम शिवसेनेला वाढवत राहिले. इतिहासात पाहा, हनुमान चालिसा तोच वाचतो, ज्याला कोणाला तरी संकटातून मुक्त करायचे असते आणि तुम्ही म्हणता, हनुमान चालिसा का म्हणायची? ही तुमची नवी विचारधारा आहे, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला.

… आणि ती वेळही लवकरच येणार

पुढे टीका करताना नवनीत राणा यांनी असे म्हटले, जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसे वाटते असे विचारणार आहे. कोणताही गुन्हा न करता तुरुंगात टाकल्याच्या दुःख काय असते हे त्यांना विचारणार आहे आणि ती वेळही लवकरच येणार आहे, जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल. तेव्हा मी विचारणार तुम्हाला कसे वाटते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.