जेव्हा मिसेस फडणवीस म्हणाल्या ‘डिवचायचं’ नाही…

फडणवीसांनी जरी दुर्लक्ष केलं असलं, तरी मिसेस फडणवीस मात्र संतापल्या आहेत. त्यांनी थेट जगतापांनाच 'भाई'गिरी स्टाईलने उत्तर दिले आहे.

गेले काही दिवस राज्यात “बाँबा-बाँब” सुरू आहे. म्हणजे अंबानींच्या घराबाहेरील जिलेटीनच्या काड्या फुटल्या नाहीत, पण त्यानंतर घडलेल्या प्रत्येक घटनेने अणूबाँबच फोडले आहेत. माजी सहाय्यक पोलिस अधिकारी सचिन वाझेंना आरोपीच्या पिंज-यात उभे केल्यानंतर, माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे कुंपण शेत खातंय की काय, असा प्रश्न सगळ्यांना पडला. या मुद्द्यावर विरोधकांनी शड्डू ठोकत सरकारला धोबीपछाड करायला सुरूवात केली आहे. त्यात अर्थातच सलामीला आहेत, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांनी विरोधकांना अनेकदा आसमान दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता त्यांना रोखायचे कसे, असा प्रश्न ठाकरे सरकारमधील नेत्यांना पडला आहे. त्यातच मग काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी उडी घेत फडणवीसांवर आरोप केला. याकडे फडणवीसांनी जरी दुर्लक्ष केलं असलं, तरी मिसेस फडणवीस मात्र संतापल्या आहेत. त्यांनी थेट जगतापांनाच ‘भाई’गिरी स्टाईलने उत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते भाई?

देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करणा-या फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती बायकोच्या बॅंकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचं उत्तर द्यावं, असा खळबळजनक आरोप केला. मग मात्र अमृता फडणवीस चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी एका ट्वीटद्वारे भाईंना चांगलाच दम भरला.

(हेही वाचाः फडणवीस म्हणाले, पवारांना दिली चुकीची माहिती! देशमुख क्वारंटाईन नव्हते तर…)

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

अमृता फडणवीसांनी ट्वीट करत भाईंच्या आरोपांना भाईंच्याच स्टाईलने उत्तर दिलं आहे. ए भाई तू जो कोण असशील माझ्यावर बोट उचलायचं नाही, अशी दमदाटीच त्यांनी केली आहे. तसेच पोलिसांची खाती ही काँग्रेसच्याच राज्यात युटीआय/अॅक्सिस बॅंकेला योग्यता पाहून दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच सरळ रस्त्याने चालणा-यांना डिवचायचं नाही, असाही दम त्यांनी भरला आहे.

अमृता फडणवीस आपल्या या आक्रमकपणामुळे कायमच चर्चेत असतात. त्यामुळे मिसेस फडणवीस यांच्या या ट्विटनंतर नेटक-यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. पण तरी सुद्धा माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने असा दम भरला म्हटल्यावर चर्चा तर होणार ना ‘भाई’…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here